मुंबई, : दक्षिण-मध्य मुंबईतील ऐतिहासिक कमाठीपुरा क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आज अधिकृत व मोठा वेग मिळाला आहे. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या (MBRRB) माध्यमातून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आज भगिरथी हाऊसिंग प्रा. लि. आणि मथी डेव्हलपर्ससोबत अधिकृत बांधकाम व विकास संस्था (C&DA) करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार संपन्न झाला. मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. मिलिंद शंभरकर आणि विकासक कंपनीचे संचालक श्री. अतुल गोयल यांनी करारावर स्वाक्षरी केली. या महत्त्वपूर्ण करारामुळे हा प्रकल्प आता कागदावरून थेट प्रत्यक्षात उतरण्याच्या टप्प्यात आला असून, आगामी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.
याप्रसंगी बोलताना श्री. संजीव जयस्वाल यांनी सांगितले की, नागरिकांची सुरक्षा, मान-सन्मान आणि दर्जेदार आधुनिक जीवनमान हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. कमाठीपुऱ्याची ऐतिहासिक आणि जुनी ओळख कायम ठेवून तेथे एक आधुनिक, शाश्वत आणि पूर्णपणे नागरिक-केंद्रित वस्ती विकसित करण्याचा म्हाडाचा मानस आहे. कराराच्या प्रसंगी म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी आणि विकासक कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
