मुंबई:
तेली सेवा समाजाचा अमृतमहोत्सव सोहळा रविवारी, २५ ऑक्टोबर रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर येथे संस्थेचे अध्यक्ष श्री. जनार्दन गवाणकर यांच्या खंबीर नेतृत्वात अत्यंत उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.
या ऐतिहासिक सोहळ्यास विधान परिषदेचे आमदार सुनील गोविंद शिंदे तसेच मुंबई पालिकेच्या माजी महापौर व विरोधी पक्षनेत्या सौ. किशोरीताई पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या मान्यवरांच्या हस्ते तेली सेवा समाजातील दिवंगत ज्येष्ठ नेत्यांचे नातेवाईक, आजी-माजी अध्यक्ष, पदाधिकारी व निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. याच धर्तीवर समाजाच्या दैदिप्यमान प्रवासाचा पट मांडणाऱ्या “समर्पित गौरव गाथा” या भव्य स्मरणिकेचे अनावरण उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात पार पडले.
कार्यक्रमात संस्थेचे माजी अध्यक्ष कै. विनायक पांडुरंग कुवेसकर यांच्या सामाजिक योगदानाचे स्मरण करून त्यांच्या सन्मानार्थ त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव व विद्यमान संचालक धनंजय विनायक कुवेसकर यांचा आमदार सुनील शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. वडिलांचा वैचारिक व सामाजिक वारसा जपताना धनंजय कुवेसकर यांनी समाजकारण, राजकारण आणि सहकार क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला असून कै. विनायकराव कुवेसकर यांच्याप्रमाणेच त्यांचाही मोठा जनसंपर्क आहे.
या अमृतमहोत्सवी सोहळ्याला मुंबईसह राज्यभरातून तेली समाजाचे विविध पदाधिकारी व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल तेली सेवा समाजाचे सर्व मान्यवरांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि उपस्थित समाजबांधवांचे मनःपूर्वक व जाहीर आभार मानले.
