मुंबई:
अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणावरून संजय राऊतांनी महायुती सरकारवर केलेल्या टीकेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पोलिसांना दरमहा १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट दिले गेले होते, असा गंभीर आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बान यांनी केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मविआ सरकारच्या काळातील ‘जंगलराज’चा पाढा वाचला.
पालघरमधील साधूंची हत्या, सुशांत सिंह राजपूत प्रकरण, दिशा सालियन मृत्यू प्रकरण आणि सचिन वाझे प्रकरण यांसारख्या गंभीर घटनांचा उल्लेख करत बान म्हणाले की, ज्यांच्या राजवटीत गुंडागर्दी आणि माफियागिरी चालली, त्यांना कायदा-सुव्यवस्था सुधारण्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. सचिन वाझेच्या बचावात उद्धव ठाकरेंनी “वाझे काय लादेन आहे का?” असा सवाल केला होता, हे राऊत कसे विसरले, असा सवालही त्यांनी केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत सक्षम गृहमंत्री असून, अंडरवर्ल्ड आणि गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी ते पूर्णपणे सक्षम आहेत. मुंबई पोलिसांच्या कारवाईवर शंका घेणाऱ्यांनी आधी स्वतःच्या काळातील कारभारा आत्मपरीक्षण करावे, असा कडक इशाराही नवनाथ बान यांनी संजय राऊतांना दिला.
