मुंबई पूर्व उपनगरातील चेंबूर आणि मानखुर्द परिसरात अनाधिकृतपणे चालवल्या जाणाऱ्या लॉजवर मुंबई महानगरपालिकेच्या एम-पूर्व विभागाने 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी दोन दिवसांची धडक कारवाई केली. या कारवाईत अनाधिकृत लॉजमधील साहित्य जप्त करण्यात आले असून त्या ठिकाणी वीज व पाणी जोडण्या खंडित करण्यात आल्या.
26 नोव्हेंबर रोजी घाटकोपर-मानखुर्द जोडमार्गावरील टी-जंक्शन, आंबेडकर नगर, मंडाळा आणि मानखुर्द परिसरातील एकूण सहा अनाधिकृत लॉजवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर 27 नोव्हेंबर रोजी चेंबूरमधील सुंदरबाग, सायन-ट्रॉम्बे मार्ग आणि शिवपूजा रेसिडेन्सी परिसरातील अनाधिकृत लॉजवर कारवाई करण्यात आली. या दोन्ही दिवसांत ताब्यात घेतलेल्या साहित्यासोबतच संबंधित लॉजची वीज व पाण्याची मीटर बंद करण्यात आली.
नियमबाह्य व्यवसायांवर कारवाई
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, नियमांबाहेर चालवल्या जाणाऱ्या व्यवसायांबाबत आणि अनाधिकृत बांधकामाबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने ही कारवाई राबवण्यात आली.
एम-पूर्व विभागाच्या उपायुक्त संध्या नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अलका ससाने यांच्या नेतृत्वात पालिका कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. कारवाईदरम्यान लॉजमध्ये सापडलेले विविध साहित्य जप्त करण्यात आले असून अनाधिकृत व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुविधा बंद पाडण्यात आल्या.
पुन्हा चालू होणार नाही, असा दावा
यापूर्वीही अशा ठिकाणांवर नोटीस देण्यात येत असली तरी कारवाई फक्त नोटीसपुरती मर्यादित राहते, अशी तक्रार नागरिकांकडून होत होती. त्यामुळे यावेळी पालिकेने केवळ जप्तीची कारवाई न करता वीज व पाणी खंडित करून अनाधिकृत व्यवसायाला थांबा घालण्याचा निर्णय घेतला आहे.
अनाधिकृत बांधकाम आणि नियमबाह्य व्यवसायांविरोधात पुढील काळातही सातत्यपूर्ण कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
