नवी दिल्ली: मतदारसंघ पुनर्रचना आणि लोकसभा-विधानसभेतील ३३ टक्के महिला आरक्षणाशी संबंधित नवीन घटनादुरुस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. जुन्या प्रस्तावांमध्ये बदल करून सरकार आता नवे विधेयक मांडण्याच्या तयारीत असून, ३० नोव्हेंबर रोजी लोकसभेचे आणि २ डिसेंबर रोजी राज्यसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.
या नवीन रचनेनुसार, लोकसभेची कमाल सदस्य संख्या ५५० वरून ८५० पर्यंत आणि राज्यांच्या विधानसभेतील संख्या मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. विविध राज्यांतील लोकसंख्यावाढीतील तफावतीमुळे प्रतिनिधित्वावर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत उपस्थित झालेल्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न या नव्या मसुद्यात केल्याचे सांगितले जात आहे. तसेच महिला आरक्षण १५ वर्षांसाठी लागू करून राखीव जागांचे रोटेशन प्रत्येक तिसऱ्या कार्यकाळानंतर करण्याचा मुद्दाही समोर आला आहे.
दुसरीकडे, या विधेयकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची रणनीती ठरवण्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षनेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे, तर इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्येही वेगवेगळ्या भूमिका दिसून येत आहेत.
