मुंबईतील महापालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागांचे संरक्षण करून शहरातील क्रीडा विकासाला गती देण्यासाठी भाजप ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या मोकळ्या जागा खासगी व्यक्ती, संस्था किंवा तृतीय पक्षाच्या ताब्यात न देता त्यांची देखभाल महापालिकेनेच करावी, असा एकमताने निर्णय मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मांडण्यात आला.
महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील आश्वासनानुसार मुंबईसाठी सर्वसमावेशक मोकळ्या जागांचे धोरण (ओपन स्पेस पॉलिसी) तयार करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. यापूर्वी पक्षाच्या बैठकीत मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, महापौर रितू तावडे, सभागृहनेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे तसेच आमदार मनीषा चौधरी, उपाध्याय, कॅप्टन तमिळ सेल्वन, कालिदास कोळंबकर, राम कदम, पराग शाह आणि मिहिर कोटेचा यांनी या भूमिकेला एकमताने पाठिंबा दिला होता.
आजच्या बैठकीस मंत्री मंगलप्रभात लोढा, महापौर रितू तावडे तसेच महापालिका प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. प्रत्येक प्रशासकीय विभागात दोन ते तीन मैदाने निवडून संपूर्ण मुंबईत एकूण १०० मैदानांवर महापालिकेच्या निधीतून आणि ‘पार्टिसिपेट मुंबई’च्या सीएसआर निधीतून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या सुविधांमुळे कोणतेही तृतीय पक्षाधिकार निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेण्यात यावी, असेही सुचवण्यात आले.
तसेच या क्रीडा सुविधांचे व्यवस्थापन ‘बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठान’कडे सोपवावे, अशी सूचना प्रस्तावात करण्यात आली आहे. मुंबईतील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या क्रीडा सुविधा मिळाव्यात, तर मोकळ्या जागांचे संरक्षण सुनिश्चित व्हावे, यासाठी भाजपने प्रशासनासमोर ठोस मागणी ठेवली आहे. शहरातील खुल्या जागा नागरिकांसाठी उपलब्ध राहाव्यात आणि त्यांचा विकास पारदर्शक पद्धतीने व्हावा, यावर भाजपचा भर असल्याचे या बैठकीत स्पष्ट झाले.
