मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेतील निलंबित सहाय्यक अभियंता अमित शेट्ये. सरोटे आणि अन्य चार कर्मचाऱ्यांच्या निलंबन प्रकरणी म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन, मुंबईच्या वतीने महापालिका आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. असोसिएशनचे कार्याध्यक्ष इंजि. रमेश भुतेकर देशमुख यांनी हे निलंबन आदेश नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांशी विसंगत आणि वस्तुस्थितीचा पुरेसा विचार न करता काढल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.
संबंधित अभियंते व कर्मचाऱ्यांची वैयक्तिक जबाबदारी निश्चित करताना उपलब्ध अभिलेख, कार्यकाळातील प्रत्यक्ष कर्तव्ये, प्रशासकीय अधिकारांची व्याप्ती आणि स्वतंत्र भूमिका यांची वस्तुनिष्ठ पडताळणी करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले. शिस्तभंगविषयक कारवाई करताना सक्षम प्राधिकाऱ्याचे अधिकार, लागू सेवा नियम, प्रमाणबद्धतेचे तत्त्व आणि निष्पक्ष चौकशी गरजेची असून, केवळ सामूहिक जबाबदारी मानून सरसकट निलंबन करणे प्रशासकीय न्यायाच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित करणारे असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व वस्तुनिष्ठ चौकशी करून निलंबन आदेशांचा तातडीने पुनर्विचार करावा आणि अन्यायकारक निलंबन मागे घेऊन संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण, प्रशासकीय पारदर्शकता आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांसाठी असोसिएशन कटिबद्ध असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
