मुंबई: शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या अनधिकृत बॅनर्सविरोधात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी कडक पावले उचलली आहेत. आज महापौरांनी स्वतः रस्त्यावर उतरून सायन उड्डाणपुलावर पाहणी केली आणि अनधिकृत बॅनर्स हटवण्याच्या कारवाईचे नेतृत्व केले. विशेष म्हणजे, कोणताही राजकीय पक्षपात न करता उड्डाणपुलावरील सर्वपक्षीय बॅनर्स महापालिका पथकाच्या मदतीने तात्काळ काढून टाकण्यात आले.
उड्डाणपूल आणि मुख्य चौकांवरील बेकायदा बॅनर्समुळे शहराच्या सौंदर्याला बाधा येत होती, तसेच वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघाताचा धोका निर्माण झाला होता. याची दखल घेत महापौरांनी पालिका अधिकाऱ्यांसह सायन येथे धडक कारवाई केली.
”मुंबई स्वच्छ आणि सुंदर ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. नियम सर्वांसाठी समान असून यापुढे अनधिकृत बॅनरबाजी खपवून घेतली जाणार नाही,” असा कडक इशारा रितू तावडे यांनी दिला. महापौरांच्या या आक्रमक भूमिकेमुळे बेकायदा बॅनर लावणाऱ्यांचे धाबे दणाणले असून नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत होत आहे.
