मुंबई, : राष्ट्रीय अजिंक्यपदासाठी स्थान मिळविण्यासाठी राज्यातील शालेय बुद्धिबळपटू एसबीआय लाइफ महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सज्ज झाले आहेत. शुक्रवार, १३ नोव्हेंबरपासून दहिसर (पश्चिम) येथील रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरू होणाऱ्या या तीन दिवसीय स्पर्धेत तब्बल ३८७ खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
इंडियन चेस स्कूलच्या वतीने आयोजित या स्पर्धेत ९, १३ आणि १७ वर्षांखालील मुले व मुली अशा सहा फिडे मानांकित गटांत सामने खेळविण्यात येतील. विशेष म्हणजे, या स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिले दोन क्रमांक मिळवणाऱ्या खेळाडूंना महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात ९ वर्षांखालील खुल्या गटात ११०, मुलींच्या गटात ५६, १३ वर्षांखालील खुल्या गटात १२३, मुलींच्या गटात ४५, १७ वर्षांखालील खुल्या गटात ३८, तर मुलींच्या गटात १५ खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या दोन्ही टप्प्यांत मिळून खेळाडूंची संख्या ८०४ वर पोहोचली आहे. पहिला टप्पा ४ ते ६ नोव्हेंबरदरम्यान पार पडला असून, त्यात ४१७ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
लहान गटात अधवान, गार्गीला अग्रमानांकन
९ वर्षांखालील खुल्या गटात अध्वान ओसवाल (१७२४) याला अग्रमानांकन मिळाले आहे. ईशान अग्निहोत्री (१६१८) आणि निहांश खोडे (१५७२) हे अनुक्रमे दुसरे व तिसरे मानांकित खेळाडू आहेत. आरव झावर (१५७१) आणि पहिल्या टप्प्यात ७ वर्षांखालील खुल्या गटाचे विजेतेपद पटकावणारा इवान दुबे (१५४५) यांच्याकडूनही कडवी झुंज अपेक्षित आहे.
९ वर्षांखालील मुलींच्या गटात नागपूरच्या गार्गी हरकरे (१५६८) हिला अग्रमानांकन देण्यात आले आहे. लिया कृष्णन (१५५८) आणि दीधिती बॅनर्जी (१५५३) या तिच्या प्रमुख प्रतिस्पर्धी असतील. पहिल्या टप्प्यात ७ वर्षांखालील मुलींच्या गटात विजेतेपद मिळवणाऱ्या लिया कृष्णनकडेही विशेष लक्ष असेल. इशी सिंग (१५३८) आणि मिराई सरदाना (१५३३) यांच्यामुळे या गटातील चुरस आणखी वाढणार आहे.
१३ वर्षांखालील गटात निर्वाण, त्वेषाकडून अपेक्षा*
१३ वर्षांखालील खुल्या गटात सर्वाधिक १२३ खेळाडूंचा सहभाग आहे. निर्वाण शाह (१९५६) याला अग्रमानांकन मिळाले असून, ओम रामगुडे (१९०६) आणि विहान राव (१८२६) हे त्याचे प्रमुख प्रतिस्पर्धी ठरणार आहेत.
मुलींच्या १३ वर्षांखालील गटात त्वेषा जैन (१६९७) हिला अग्रमानांकन मिळाले आहे. इहिना अय्यर (१५६६), निश्का अग्रवाल (१५६२) आणि तिस्या भट्ट (१५२४) या तिच्यासमोर आव्हान उभे करतील. पहिल्या टप्प्यात ११ वर्षांखालील मुलींच्या गटाचे विजेतेपद पटकावणाऱ्या त्वेषाकडून पुन्हा दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.
१७ वर्षांखालील गटातही रंगतदार मुकाबला
१७ वर्षांखालील खुल्या गटात आर्य बागायतकर (१७४२) याला अग्रमानांकन मिळाले आहे. युवराज सिंग (१६९०), सोहम सहमाते (१६६७) आणि दैविक मेहता (१६४२) हे त्याचे प्रमुख प्रतिस्पर्धी असतील.
मुलींच्या १७ वर्षांखालील गटात दृष्या नाईक (१७१३) ही सर्वोच्च मानांकित खेळाडू आहे. हिमांशी तेंडुलकर (१५३०), इक्षा सोनी (१५२८) आणि त्रिशा जगताप (१५२७) यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
राष्ट्रीय स्पर्धेचे लक्ष्य; ६० हजारांची पारितोषिके
अहमदाबाद येथे १६ ते २० डिसेंबर २०२६ या कालावधीत राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी या राज्यस्तरीय स्पर्धेतील सहाही गटांमधील पहिले दोन क्रमांक मिळवणाऱ्या खेळाडूंची निवड केली जाणार आहे. त्यामुळे केवळ विजेतेपदच नव्हे, तर राष्ट्रीय स्पर्धेचे तिकीट मिळवण्यासाठीही प्रत्येक डाव महत्त्वाचा ठरणार आहे.
स्पर्धेसाठी एकूण ६० हजार रुपयांची रोख पारितोषिके ठेवण्यात आली असून, प्रत्येक गटासाठी १० हजार रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. प्रत्येक गटातील पहिल्या तीन क्रमांकांच्या खेळाडूंना एसबीआय लाइफ चषक, तर चौथ्या ते दहाव्या क्रमांकावरील खेळाडूंना पदके देऊन गौरविण्यात येणार आहे. सात फेऱ्यांच्या या स्पर्धेचे संचालन मुख्य पंच आंतरराष्ट्रीय पंच पी. बी. भिलारे यांच्या देखरेखीखाली होणार आहे. स्पर्धेला एसबीआय लाइफचे मुख्य प्रायोजकत्व लाभले असून, रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल हे स्थळ भागीदार आहेत.
