भूमिपूजन सोहळ्यात भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकरांचे कौतुकोदगार
मुंबई – कोट्यावधी मराठी माणसाला घर द्यायचेय ही भावना डॉ. सुरेश हावरे यांच्या मनात आहे व ते त्यांच्या यशाचे गमक असल्याचे कौतुकोदगार भाजपा गटनेते व महाराष्ट्र स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकराल यांनी काढले.
चेंबूरच्या टिळकनगर येथील इंटेलीजेंटीया अँपेक्स या हावरे प्रॉपर्टीजतर्फे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे भूमिपूजन सोहळा रविवारी भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी माजी आमदार सूर्यकांत दळवी, नगरसेवक सुषम सावंत, हावरे प्रॉपर्टीजचे सर्वेसर्वा डॉ. सुरेश हावरे, अमित हावरे, अमर हावरे, संजय हावरे यांसह सोसायटीचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भूमिपूजन सोहळ्यात बोलताना आ. दरेकर म्हणाले कि, डॉ. सुरेश हावरे यांचे बांधकाम क्षेत्रातील काम मला दुरून पाहता आले. सर्वसामान्य मराठी माणसाला आपले हक्काचे घर मिळावे ही आपलेपणाची भावना घेऊन परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर डॉ. सुरेश हावरे यांनी उभी केली आहेत, याचा सार्थ अभिमान आहे. बांधकाम क्षेत्रात कुठलेही पाठबळ नसताना त्यांनी प्रामाणिकपणे हे उभे केलेय. कोट्यावधी मराठी माणसाला घर द्यायचेय ही भावना त्यांच्या मनात आहे व ते त्यांच्या यशाचे गमक असल्याचेही आ. दरेकरांनी म्हटले.
आ. दरेकर पुढे म्हणाले कि, प्रत्येक विकासकाचा मूळ उद्देश आपल्याला घर देणे हा नसतो. तर सेलेबलचा टॉवर उभारून पैसा कमवणे हा असतो. परंतु हावरे यांच्यासारखे व्यावसायिक जे प्रामाणिकपणे काम करतात, त्यांचा उद्देश नफा कमवणे नाही तर मध्यमवर्गीय विशेषतः मराठी माणसाला चांगले घर मिळाले पाहिजे ही भावना घेऊन ते काम करताहेत. सभासदांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेणे व समन्वयातून मार्ग काढण्याचे काम हावरे यांच्या कंपनीतून होताना पाहिल्याचेही दरेकरांनी सांगितले.
आ. दरेकर पुढे म्हणाले कि, मुंबईत हजारोंच्या संख्येने मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली स्वयं पुनर्विकास योजना राबवूया. गृहनिर्माण संस्थांनी स्वतःची इमारत बांधण्यासाठी पुढाकार घ्यावा, त्यासाठी मुंबई बँक कर्ज उपलब्ध करून देईल, वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती राज्य सरकार देईल अशी योजना आणली. मुंबई बँकेने धोरण केले. मुख्यमंत्र्यांनी स्वयं पुनर्विकासाला साथ दिली व अनेक निर्णय घेतले. मुंबईतील मराठी माणूस मुंबईबाहेर जाण्यापासून वाचविण्याचा खारीचा वाटा उचलण्याचे काम आम्ही केले. हावरे पण तेच काम करताहेत. ज्यावेळी मराठी माणूस धाडसाने पुढे येतो त्यावेळी ताकदीने त्याच्या मागे उभे राहणे हे संस्कार आमच्या मनावर झालेत. हावरे यांच्यासारखा विकासक प्रामाणिकपणे, विश्वासाने तुमचे काम करण्यासाठी पुढे येतात त्यावेळी त्यांना साथ दिली पाहिजे.हावरे यांनी ४५ हजार ग्राहकांना घरे दिली. एवढे काम कुठलाच विकासक मध्यमवर्गीयांसाठी करत नाही. मुंबई ही आर्थिक लूटमार करण्यासाठीच आहे अशा प्रवृत्तीने काही झपाटलेली लोकं मराठी माणसासाठी काम करत नाही. त्यांच्यासाठी हावरे यांच्यासारखा माणूस कमी नफा झाला तरी चालेल पण मला मध्यमवर्गीयांना घर द्यायचेय ही भावना घेऊन जेव्हा काम करतो तेव्हा निश्चितच अभिमान वाटतो, असे कौतुकोदगारही आ. दरेकरांनी काढले.
