अमरावती, — हलाल प्रमाणीकरणविरोधात हिंदू राष्ट्र समन्वय समितीने ‘हलालमुक्त दिवाळी अभियान’ (#HalalFreeDiwali) जाहीर केले आहे. अमरावतीत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी देशभर हलाल प्रमाणीकरण प्रणालीवर बंदीची मागणी केली आणि आगामी हिवाळी अधिवेशनात या विषयावर संसदेत आवाज उठवणार असल्याचे सांगितले.
डॉ. बोंडे यांनी म्हणाले की, खाद्यपदार्थांच्या प्रमाणीकरणाचा अधिकार फक्त FSSAI आणि अन्न व औषध प्रशासन विभागाकडे असावा. खाजगी धार्मिक संस्थांकडून हलाल प्रमाणपत्र देणे अयोग्य असून, उत्तर प्रदेश सरकारच्या धोरणाप्रमाणे देशव्यापी बंदी लागू करावी, अशी त्यांची भूमिका होती. त्यांनी पशुक्रूरता आणि अवैध मांस विक्रीवर देखील कठोर कारवाईची मागणी केली.
समितीचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी दिवाळी, गणेशोत्सव आणि इतर सणांसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर हलाल प्रमाणपत्र लावले जात असल्याचा आक्षेप घेतला. ग्राहकांनी हलाल प्रमाणित उत्पादने टाळावीत, असे आवाहन त्यांनी केले.
या अभियानाअंतर्गत देशभर व्यापाऱ्यांच्या बैठका, जनजागृती आणि होर्डिंग्ज उपक्रम राबवले जाणार आहेत. परंतु, परिषदेत करण्यात आलेले काही आर्थिक व सुरक्षा-संबंधी दावे हे वक्तव्यावर आधारित असून त्यांची स्वतंत्र पडताळणी उपलब्ध नाही.
