पुणे : पुण्यातील मुंढवा जमीन खरेदीचा व्यवहार आपल्याला माहिती नव्हता, नाहीतर आपण असं होऊच दिलं नसतं असा हास्यास्पद खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. अशा जमिनीची खरेदीखत होऊच शकत नाही, तरीदेखील हा व्यवहार कसा झाला हे पाहावं लागेल असंही अजित पवार म्हणाले. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी नेमलेली समिती बारकाईने तपास करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुंढव्यातील महार वतनातील १८०० हजार कोटी रुपये किमतीची जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने फक्त ३०० कोटींना खरेदी केली. त्यासाठी असलेला २१ कोटी रुपयांची स्टँप ड्युटीही माफ करण्यात आल्याचं समोर आलं. त्यानंतर विरोधकांनी अजित पवारांचा राजीनामा मागितला आहे.या प्रकरणवर बोलताना अजित पवार म्हणाले की, “असे व्यवहार होऊन शासनाचं नुकसान होऊ नये. काहींनी धाडस दाखलं, ते कसं दाखवलं याची चौकशी झाली की सत्य समोर येईल. ज्या व्यवहाराची नोंदणीच करता येत नाही, तो झालाच कसा? या प्रकरणात खरेदीखत होऊ शकत नाही. तरीही हा व्यवहार कसा झाला हे माहिती नाही. या प्रकरणात कुणाचा दबाव होता का हे पाहावं लागेल.”
बोपोडी मध्ये आमचा कुणाचाही संबंध नव्हता, पण त्यामध्ये आमच्या कुटुंबीयांचं नाव घेतलं गेलं. मला हा व्यवहार झाल्याची माहिती नव्हती, नाही तर मी असं होऊच दिलं नसतं असं अजित पवार म्हणाले.मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात कडक भूमिका घेतली आहे. स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांची समिती नेमून याचा तपास करण्यात येत आहे. ही समिती बारकाईने तपास करेल आणि त्यातून सत्य बाहेर येईल असं अजित पवार म्हणाले.मुंढवा भागातील सरकारी जमीन घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांचं नाव यात आल्याने या प्रकरणाला वेगळंच वजन आल्याचं दिसतंय. त्याचवेळी या तापलेल्या प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीचा पत्ता लागत नसल्याने, पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. ती देशाबाहेर पळून गेल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहेपार्थ पवारांचे मामेभाऊ आणि व्यवसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी संगणमत करुन शासनाचा 5 कोटी 89 लाख 31 हजार आठशे रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या अन्य तिघांमध्ये या जागेची पॉवर ऑफ अॅटर्नी असलेल्या शितल मेजवानी आणि रविंद्र तारू यांचा समावेश आहे, मात्र दिग्विजय पाटलांचे व्यवसायिक भागीदार असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

