शरद पवारांचा पक्ष ९ तारखेला खुलासा करणार
मुंबई/गेल्या काही काळापासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरु आहे. अनेक नेत्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अशातच आता शरद पवार यांच्या पक्षाने दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर न बोलण्याच्या सूचना प्रवक्ते, नेत्यांना दिल्या आहेत. राष्ट्रवादी विलिनीकरणावरुन पवार गटाने ही सावध भूमिका घेतली आहे. आता ९ तारखेला रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पत्रकार परिषदेत मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या पत्रकार परिषदेकडे संपर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांची आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांना दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना ते म्हणाले की, ‘मी आमच्या पक्षाबद्दलच बोलणार आहे. मी कोणत्याही काल्पनिक गोष्टीवर बोलणार नाही. माझ्या परीने एवढंच सांगतो की, मी आमच्या पक्षात अजितदादांनंतर पदाच्या हिशोबाने सर्वात ज्येष्ठ सहकारी होतो. माझी भूमिका अजितदादांच्या सुसंगत राहिली. तेव्हाच २०२३ रोजी आम्ही निर्णय केला. आम्ही त्यांच्यासोबत राहिलो. सर्व आमदार अजितदादांसोबत राहिले. त्यामुळे अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी चालली. आमच्याकडे निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.पुढे बोलताना पटेल म्हणाले की, ‘अजित पवार यांनी याआधी अनेक मुलाखती दिलेल्या आहेत. विलीनीकरणाबाबत त्यांची माझ्यासोबत कोणतीही चर्चा झाली नव्हती. विलीनीकरणावर चर्चा झाली असती तर त्याबाबत आम्हाला माहिती नाही, असं होऊच शकत नाही. मी अजितदादांच्या दोन मुलाखती पाहिल्या आहेत. त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आमच्यासमोर विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही. फक्त स्थानिक स्वराज्यसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत युती होती’ असेही पटेल यांनी स्पष्ट केले आहे

