मुंबई, (प्रतिनिधी)- हातातली लेखणी थांबली, पण त्यांनी लिहिलेली बातमी मात्र त्यांच्या निधनानंतरही वाचकांपर्यंत पोहोचली. मृत्यूने शरीर हिरावून घेतले, पण पत्रकारितेचे व्रत अखेरच्या श्वासापर्यंत जपणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार नारायण जाधव यांच्या आयुष्याचा हा विलक्षण आणि तितकाच हृदयस्पर्शी शेवट आहे. दैनिक ‘सामना’चे माजी वरिष्ठ उपसंपादक नारायण जाधव यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनानंतरही गुरुवारी एका दैनिकात त्यांच्या नावाने बातमी प्रसिद्ध झाली आणि पत्रकारितेवरील त्यांच्या अढळ निष्ठेची जणू अखेरची साक्षच वाचकांसमोर आली. त्यांच्या निधनाने पत्रकारितेतील अभ्यासू, अनुभवी आणि भाषेवर विलक्षण प्रभुत्व असलेला एक निष्ठावंत पत्रकार हरपला आहे. जुन्नर तालुक्यातील आळेफाटा या त्यांच्या जन्मगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नारायण जाधव म्हणजे केवळ बातम्या लिहिणारे पत्रकार नव्हते, तर बातमीचा गाभा ओळखणारे आणि शब्दांची ताकद जाणणारे कसलेले वृत्तपत्रकर्मी होते. दैनिक ‘सामना’मध्ये त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ विविध विभागांत काम केले. पीटीआय आणि यूएनआय या प्रतिष्ठित वृत्तसंस्थांकडून इंग्रजीतून येणाऱ्या बातम्यांचे अचूक, आशयघन आणि प्रभावी मराठी भाषांतर करण्यात त्यांचा हातखंडा होता. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. इंग्रजी बातमीचा केवळ शब्दशः अनुवाद न करता तिचा मूळ आशय, संदर्भ आणि गांभीर्य कायम ठेवत ती अस्सल मराठीत वाचकांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. वृत्तपत्राच्या धावपळीतही भाषेचा दर्जा आणि बातमीचा नेमकेपणा यांच्याशी त्यांनी कधी तडजोड केली नाही.
त्यांच्या पत्रकारितेतील निष्ठेचा सर्वाधिक बोलका दाखला म्हणजे निधनाच्या आदल्या दिवशीपर्यंत सुरू असलेली त्यांची बातमीदारी. ‘सामना’मधून निवृत्त झाल्यानंतर अनेक जण लेखणीला विश्रांती देतात, मात्र जाधव यांनी पत्रकारितेपासून स्वतःला कधीच दूर केले नाही. धारावीत अदानी कंपनीच्या पुनर्विकास शिबिरावर शाहूनगर रहिवाशांनी टाकलेला बहिष्कार या विषयावर त्यांनी लिहिलेली बातमी गुरुवारी ‘बित्तंबातमी’ या दैनिकात त्यांच्या बायलाईनसह प्रसिद्ध झाली. बुधवारी रात्री त्यांचे निधन झाले आणि दुसऱ्याच दिवशी त्यांच्या नावाने प्रसिद्ध झालेली ही बातमी अनेकांच्या काळजाला चटका लावणारी ठरली. ज्या पत्रकाराने आयुष्यभर इतरांच्या बातम्या समाजापर्यंत पोहोचवल्या, त्याच पत्रकाराच्या निधनाची बातमी प्रसिद्ध होत असताना त्यांची स्वतःची बातमीही वृत्तपत्रात झळकत होती, हा विलक्षण योगायोग मन सुन्न करणारा आहे.
निवृत्तीनंतरही त्यांचे वृत्तपत्रांशी असलेले नाते केवळ व्यावसायिक नव्हते, तर ते जगण्याचा अविभाज्य भाग होते. ‘सामना’ आणि शिवसेनेशी असलेली त्यांची निष्ठा अखेरपर्यंत कायम राहिली. कामगार क्षेत्रातील प्रश्न, सामाजिक घडामोडी आणि सर्वसामान्यांच्या समस्यांची त्यांना सखोल जाण होती. सहकाऱ्यांना प्रोत्साहन देणे, नवोदित पत्रकारांना भाषेचे आणि बातमीदारीचे धडे देणे, त्यांच्यातील गुण ओळखून त्यांना पुढे आणणे, माणसे जोडणे हा त्यांच्या स्वभावाचा स्थायीभाव होता.
आज पत्रकारितेत वेगाला महत्त्व आले असले, तरी बातमीचा आशय, भाषेची श्रीमंती आणि पत्रकारितेची बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित करणारी पिढी काळाच्या पडद्याआड जात आहे. नारायण जाधव यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत या मूल्यांची जपणूक केली. त्यांची शेवटची बायलाईन ही केवळ एक बातमी नव्हे, तर पत्रकारितेवरील त्यांच्या प्रेमाची, निष्ठेची आणि अखंड कार्यमग्नतेची अखेरची स्वाक्षरी ठरली. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून सहकारी, मित्रपरिवार आणि पत्रकार जगतातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
