मुंबई: कुर्ला परिसरातील फिनिक्स मॉलजवळील उद्यानाच्या परिसरात फिरण्यासाठी आलेल्या एका जोडप्याला छेडछाड आणि मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित जोडपे परिसरात फिरत असताना काही मुलांच्या टोळक्याने शेरेबाजी करत छेडछाड सुरू केली. या प्रकाराला उपस्थित नागरिकांनी विरोध केल्यानंतर टोळक्याने आक्रमक पवित्रा घेत तरुण-तरुणीला काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी काही मुले १३ ते १४ वर्षे वयोगटातील अल्पवयीन असल्याचे बोलले जात आहे.
कमी वयातच गुन्हेगारी प्रवृत्ती आणि कायद्याची भीती नसल्याचे या घटनेतून स्पष्ट होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अल्पवयीन आरोपींना लगेच दिलासा न देता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी जोर धरत आहे. या प्रकरणातील गुन्हेगारी मानसिकतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी कायदेशीर चौकटीबरोबरच पालक आणि समाजाची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची असल्याचे मत पुढे येत आहे.
