पुणे: राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पुण्यात राजकीय वातावरण तापलं आहे, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच, हडपसर परिसरातील काळेपडळ येथे एक प्रचार मोहिम सुरू असतानाच दगड मारल्याची घटना घडली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत भानगिरे यांच्या कारचं काही प्रमाणात नुकसान झालं असून, यामध्ये महिला उमेदवार सारिका पवार या जखमी झाल्या आहेत या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काल (बुधवारी, ता ७) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नाना भानगिरे आणि प्रभाग क्रमांक ४१ च्या उमेदवार सारिका पवार या आपल्या कार्यकर्त्यांसह हडपसरमधील काळेपडळ भागातील मयूर जेएमएनएस सोसायटी परिसरात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आणि प्रचारासाठी गेले होते. त्याचवेळी अचानक काहींनी त्यांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. या घटनेत भानगिरे यांच्या कारची काच फुटली, तर एक दगड लागल्याने उमेदवार सारिका पवार यांच्या हाताला दुखापत झाली आहे.घटनेनंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेबाबतची माहिती काळेपडळ पोलीस ठाण्याला देण्यात आली, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले जात असून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी यावेळी दिलं आहे.तर दुसरीकडे हल्ला झालेले नाना भानगिरे यांनी याप्रकरणी बोलताना म्हटलं की, निवडणुकीच्या काळात अशा प्रकारचे भ्याड हल्ला करणे चुकीचं आहे. या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेमुळे परिसरात काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. काही वेळानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
प्रभाग क्रमांक ४१ मध्ये प्रचार करत असताना यांच्यावर काही हल्लेखोरांनी हल्ला केला, यामध्ये त्या जखमी झाले असून शहराध्यक्ष नाना भानगिरे हे देखील प्रचाराला गेले असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. शिवसेनेच्या शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्याकडून देखील तक्रार दाखल करण्याचा काम सुरू आहे.

