मुंबईत गिरणी कामगारांसाठी म्हाडाद्वारे दादर आणि नायगाव परिसरात बांधलेली घरे स्वस्त दरात मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल माने, संतोष टकले, विलास भालेराव, सिद्धेश जाधव, नीलेश खाडे, सुधीर वायंगणकर आणि शीला धुरी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपी अनिल माने यांचे दादर पूर्व येथे ‘ओम इस्टेट इंटरप्रायजेस’ नावाचे कार्यालय असून, तिथे टकले आणि भालेराव काम करत असत.
छपाई व्यवसाय करणारे संतोष शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी १६ जणांना एकत्र करून त्यांच्याकडून तब्बल ३ कोटी ६० लाख रुपये उकळले आहेत. पैसे घेऊनही घरे न मिळाल्याने हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, फसवणूक झालेल्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
