मुंबई
मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) आणि महिला आरक्षण ही देशाच्या विकासाला तसेच लोकशाही अधिक बळकट करण्याला चालना देणारी महत्त्वाची विधेयके आहेत. या विधेयकांच्या आवश्यकतेला शरद पवार, एम. के. स्टॅलिन यांच्यासारख्या अन्य नेत्यांनीही समर्थन दिले आहे. या विधेयकांना जो कोणी पाठिंबा देईल, त्या सर्वांचे मी स्वागत करतो, अशी भूमिका शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली. ते मुंबई येथे पत्रकारांशी साधताना बोलत होते.
लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारांची संख्या २२ ते २६ लाखांपर्यंत पोहोचली आहे. शंभर किलोमीटर पेक्षा अधिक लांबीचे मतदारसंघ आहेत. इतक्या मोठ्या मतदारसंख्येला न्याय देण्यासाठी, मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि विकासाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचना आवश्यक आहे. त्यामुळे डिलिमिटेशन विधेयकाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असून, पक्षाचे सर्व खासदार या विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान करणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
महिला आरक्षण विधेयकामुळे महिलांना लोकसभा आणि विधानसभा स्तरावर जनसेवेची संधी अधिक व्यापक होईल. महिलांना राजकीय क्षेत्रात न्याय मिळण्याच्या दृष्टीने हे विधेयक महत्त्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवून महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दुष्काळी परिस्थितीत महिलांना मिळणारा आधारही अधोरेखित झाला आहे. महिला आरक्षणामुळे माता-भगिनींना राजकारणात अधिक संधी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत असून, देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. या विकासाचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिक प्रभावी असणे गरजेचे आहे. त्यासाठी मतदारसंघ पुनर्रचना महत्त्वाची असल्याचे शिंदे म्हणाले.
डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण या दोन्ही विधेयकांना समर्थन देणाऱ्या सर्व नेत्यांचे स्वागत करत, ३० तारखेला ही विधेयके पारित झाल्यास देशाच्या इतिहासातील हा महत्त्वाचा ऐतिहासिक टप्पा ठरेल, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
