सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण
मुंबई: देशातील ३० हजार कोटी रुपयांच्या पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर इंडस्ट्रीत सध्या मोठी खळबळ उडाली असून, यामागे मोठे व्यावसायिक राजकारण असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. २०२२ मध्ये रिलायन्स रिटेलने बिसलेरी खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, बिसलेरीने ६ ते ७ हजार कोटी रुपयांची मागणी केल्याने हा व्यवहार फिसकटला. यानंतर रिलायन्सने स्वतः या बाजारपेठेत उतरण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाची क्रोनोलॉजी समजून घेतल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर येतात. सप्टेंबर २०२५ मध्ये पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून थेट ५ टक्क्यांवर आणण्यात आला. त्यानंतर अवघ्या एका महिन्यातच, म्हणजेच ऑक्टोबर २०२५ मध्ये रिलायन्सने ‘कॅम्पा श्युअर’ (Campa Sure) आणि ‘इंडिपेंडन्स’ (Independence) हे दोन नवीन ब्रँड्स बाजारात उतरवले. बिसलेरीची २० रुपयांना मिळणारी १ लिटरची पाण्याची बाटली रिलायन्सने अवघ्या १५ रुपयांत उपलब्ध करून देत थेट बिसलेरीच्या ३५ टक्के मार्केट शेअरला आव्हान दिले.
अशातच, नोव्हेंबर २०२६ मध्ये बिसलेरीचे पाणी पिण्यास असुरक्षित (अनसेफ) असल्याच्या बातम्या समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ही कारवाई बिसलेरीच्या १४३ प्लांट्सपैकी गोव्यातील एका प्लांटमधील काही बाटल्यांच्या तब्बल १४ महिन्यांपूर्वीच्या नमुन्यांवरून करण्यात आली आहे. तब्बल १४ महिन्यांनंतर प्रशासनाला हे पाणी असुरक्षित असल्याचा साक्षात्कार कसा झाला, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
१९७० पासून आजतागायत सुरक्षित असलेले बिसलेरीचे पाणी, बड्या उद्योगपतीचे नवीन ब्रँड्स बाजारात आल्यानंतर अचानक असुरक्षित कसे ठरवले गेले? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. एफएसएसएआयच्या (FSSAI) या कारवाईमुळे बिसलेरीच्या ब्रँड व्हॅल्यूला मोठा फटका बसणार असून, याचा थेट फायदा रिलायन्स आणि इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांना होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे.
