मुंबई:
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (मुंबै बँक) २०२६-२७ ते २०३१-३२ या पंचवार्षिक निवडणुकीत ‘बिनविरोध’ निवडीच्या नावाखाली सर्वसामान्य सभासद संस्थांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जात असल्याचा आक्षेप लोकसेवक चंद्रशेखर कानडे यांनी नोंदवला आहे. या निवडणुकीसाठी महायुतीने ‘सहकार पॅनेल’च्या माध्यमातून मोर्चेबांधणी सुरू केली असून, जास्तीत जास्त जागा बिनविरोध निवडून आणण्याच्या हालचालींना कानडे यांनी विरोध दर्शवला आहे.
बँकेच्या २१ संचालक पदांसाठी निवडणुकीचे बिगुल वाजले असून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रवीण दरेकर, उद्योगमंत्री उदय सामंत आणि विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्यात निवडणूक रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली. महायुतीतील घटक पक्षांच्या जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार निश्चित केला जाणार आहे.
सोयीच्या राजकारणावर आक्षेप
मागील निवडणुकीप्रमाणेच यंदाही राजकीय तडजोडी करून निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी पडद्यामागे सूत्रे हलवली जात असल्याची चर्चा सहकार वर्तुळात आहे. या प्रक्रियेवर बोट ठेवत चंद्रशेखर कानडे यांनी आपली भूमिका मांडली आहे. गृहनिर्माण संस्था, नागरी सहकारी बँका, पतसंस्था आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळण्याऐवजी, नेत्यांच्या सोयीच्या राजकारणामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यावर भर दिला जात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
लोकशाही प्रक्रियेतून आपले प्रतिनिधी निवडून देण्याचा सभासदांचा अधिकार अबाधित राहावा, अशी भावना अनेक सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींकडूनही व्यक्त होत आहे. त्यामुळे महायुतीचे हे ‘बिनविरोध’चे प्रयत्न यशस्वी होणार की याविरोधात स्वतंत्र पॅनेल उभे राहून प्रत्यक्ष मतदान होणार, याकडे मुंबईच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
