मुंबई: कॉटन ग्रीन परिसरात राहणाऱ्या ४८ वर्षीय महेंद्र म्हापंकर या मोबाईल दुरुस्ती करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकाला आयकर आणि जीएसटी विभागाकडून तब्बल ३१.८० कोटी रुपयांच्या कर थकबाकीची नोटीस मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
कोरोना काळात काम बंद असताना महेंद्रची ओळख संजय तांबे नावाच्या स्वच्छता मार्शलशी झाली. तांबेने सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली महेंद्रची कागदपत्रे घेतली. त्यानंतर त्याच्या नावाने ‘गॅलेक्सी ट्रेडर्स’ ही बनावट कंपनी स्थापन करून दोन बँकांमध्ये खाती उघडली. आरोपींनी महेंद्रच्या या कागदपत्रांचा आणि बनावट बँक खात्यांचा वापर करून कोट्यवधी रुपयांचा निर्यात व्यवसाय केला, ज्याबद्दल महेंद्रला काहीही माहिती नव्हती.
पोलिसांत गुन्हा दाखल
अचानक ३२ कोटींची नोटीस आल्यानंतर महेंद्रने कर सल्लागाराच्या मदतीने आयकर विभागाशी संपर्क साधला, जिथे नोटीस खरी असल्याचे स्पष्ट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महेंद्रने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
