मुंबई विधानसभा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांना फसवणारे असून, सोयाबीन, तूर, मूग, कापूस यांसारख्या पिकांच्या खरेदीअभावी शेतकरी हवालदिल झाले आहेत.
उपमुख्यमंत्री कर्जमाफीबाबत दिलेले आश्वासन नाकारत आहेत, तर कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने केंद्रीय मंत्र्यांचीच मुले असुरक्षित असल्याचे दिसत आहे. ‘लाडकी बहिण’ योजनेत दहा लाख बहिणींना अपात्र ठरविल्याने ही योजना केवळ निवडणूक प्रलोभन असल्याचे उघड झाले आहे. विकासाच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असून, राज्यभरातील कंत्राटदार संपावर आहेत. अशा शेतकरी-विरोधी आणि बेरोजगार-विरोधी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याची घोषणा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
अजिंक्यतारा या शासकीय निवासस्थानी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव ठाकरे), काँग्रेस आणि शरद पवार गटाची एक बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

