मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वराज्यभूमी गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क दादर चौपाटी, वरळी कोळीवाडा चौपाटी येथे गणेशमूर्ती विसर्जनासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची देशभरातील १३ वरिष्ठ महसुली अधिकारी आणि तज्ज्ञांच्या अभ्यास पथकाने पाहणी केली. भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) मुंबईच्या ‘सार्वजनिक धोरण व्यवस्थापन कार्यक्रमा’ अंतर्गत हा दौरा आयोजित करण्यात आला होता. गर्दी व्यवस्थापन, नागरी सुविधा, सुरक्षा आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाबद्दल या पथकाने पालिकेच्या कामाचे भरभरून कौतुक केले.
यंदाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर २० मनोरे, १२ कृत्रिम तलाव, ९० प्रसाधनगृहे, २२ तराफे, सुमारे १,२०० स्टील प्लेट्स, २२ निर्माल्य कलश, प्राथमिक आरोग्य केंद्र, फ्लड लाईट्स, सर्च लाईट्स, ३ रुग्णवाहिका आणि १ हजारहून अधिक मनुष्यबळ सज्ज ठेवण्यात आले आहे. आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख रश्मी लोखंडे आणि सहायक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर वाघ यांनी नियंत्रण कक्षाची कार्यपद्धती, AI तंत्रज्ञानाचा वापर व सुरक्षा उपायांची माहिती दिली. लाखो भाविकांच्या सुरक्षेचे हे नियोजन सार्वजनिक प्रशासनासाठी आदर्श असल्याचे अभ्यास पथकाने नमूद केले.
दरम्यान, या उत्कृष्ट व्यवस्थापनाचा एकीकडे गौरव होत असतानाच, दुसरीकडे काही त्रुटींमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मुंबई महापालिका कंत्राटदारांमध्ये अधिकाऱ्यांवर रोष पाहायला मिळत आहे. विसर्जनाशी संबंधित चौपाटी आणि कृत्रिम तलाव गणपती विसर्जन अशा विविध कामांचे कंत्राट गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठराविक कंपनीला आणि जीवरक्षक कामगार पुरवणारी संस्था यांना दिले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
एकाधिकारशाहीमुळे कामाच्या गुणवत्तेवर आणि नियोजनावर परिणाम होत असून लहान-मोठ्या त्रुटी वारंवार समोर येत आहेत.सर्वसामान्यांच्या भावना आणि पारदर्शकतेचा मुद्दा लक्षात घेऊन प्रशासनाने कंत्राट प्रक्रियेत सुसूत्रता आणणे आणि कामांचे विकेंद्रीकरण करणे गरजेचे असल्याचे मत स्थानिकांमधून व मुंबई जनसत्ता वृत्तपत्र व्यक्त मागील दोन वर्षापासून करत आहे . परंतु प्रशासन अधिकारी गेंड्याच्या कातडीचे झाले असून थातून मातुर उत्तरे देऊन याकडे सोईस्कर दुर्लक्ष करून खाजगी कंत्रादार कामाला अधिकाधिक वाव कसा मिळेल याकडे लक्ष दिले जाते. मुंबई महापालिका अधिकारी मागील अनेक वर्षापासून तेच तेच अधिकारी काम करत असल्यामुळे कंत्राटदार आणि त्यांचे लागेबंधे घट्ट झाली आहेत. त्यामुळे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. केलेल्या घोटाळ्या बाबत तक्रार झालावर त्याकडे दुर्लक्ष करून फाट्यावर मारण्याचा प्रकार चालू आहे. या अंतर्गत तक्रारीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे कंत्राटदार आणि लोभी अधिकारी मालामाल झाले आहेत .
