गुवाहाटी: आसामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या २५ वर्षांपासून अनेकांवर उपचार करणारा डॉक्टर बोगस असल्याची माहिती उघडकीस आली आहे. डॉक्टरनं गेल्या अडीच दशकांमध्ये हजारो लोकांवर उपचार केले. एस. सरताज उद्दीन असं बोगस डॉक्टरचं नाव आहे. सध्या तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्या अटकेसाठी छापे टाकले जात आहेत.
२००१ ते २०२५ या कालावधीत सरताज उद्दीननं अनेकांवर उपचार केले. पण त्याच्याकडे कोणतंही वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा पदवी नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अडीच दशकांच्या कालावधीत त्यानं बोनगायगावमध्ये बहुमजली इमारत उभारली. त्याचा स्वत:चा दवाखाना बिनदिक्कतपणे सुरु होता. सरताज उद्दीन याच्याकडे येणाऱ्या रुग्णांना त्याच्याबद्दल जराही संशय आला आहे.आसाम काऊन्सिल ऑफ मेडिकल रजिस्ट्रेशनला सरताज उद्दीन विरोधात तक्रार मिळाली. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेचं लक्ष सरताजच्या दवाखान्याकडे गेलं. यानंतर बोनगायगाव पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. तब्बल अडीच दशकं बोनगायगावमध्ये सरताजचा दवाखाना सुरु होता. या कालावधीत त्याच्याकडे हजारो रुग्ण येऊन गेले. आता हा प्रकार उघड झाल्यानंतर त्या रुग्णांना धडकी भरली आहे.गेल्या २५ वर्षांपासून समाजात उजळ माथ्यानं फिरत असलेला डॉक्टर बोगस असल्याचं समजताच त्याच्याकडून उपचार घेतलेल्या, उपचार घेणाऱ्यांना चिंता वाटू लागली आहे. अशा प्रकारचे किती डॉक्टर इतकी वर्षे काम करत असताना प्रशासकीय यंत्रणा काय करत होती, असा प्रश्न निर्माण झाला आहे.आसामच्या काचर जिल्ह्यात या वर्षाच्या सुरुवातीला प्रशासनानं बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम उघडली होती. बोगस, अपात्र डॉक्टरांची धरपकड सुरु करण्यात आली. बोगस डिग्रीच्या आधारे गेल्या १० वर्षांत ५० सी सेक्शन करणाऱ्या एका डॉक्टरच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.

