[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

भारत-पाकदरम्यानच्या युद्धबंदीची ट्रम्पनी केलेली घोषणा चुकीचीच

अमेरिकन खासदार श्री ठाणेदार यांची ट्रम्पवर सडकून टीका
मुंबई : भारताने दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी पाकिस्तानवर केलेला सर्जिकल स्ट्राईक योग्यच होता. मुळात ते युद्ध नव्हतेच तरीही उत्साहाच्या भरात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली युद्धबंदीची घोषणा साफ चुकीची असल्याची टीका अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचे एकमेव मराठी खासदार श्री ठाणेदार यांनी केली.
मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. ‘ऑपरेशन सिंदूर आणि अमेरिका-भारत संबंध’ या विषयावर बोलताना खासदार श्री ठाणेदार म्हणाले, ‘ऑपरेशन सिंदूर हे युद्ध आहे, असे अमेरिकन जनतेला वाटत नाही, हे ऑपरेशन दहशतवादाविरुद्ध होते आणि अमेरिकन जनता नेहमीच दहशतवादविरोधी लढ्याला पाठिंबा देत, असेही ते म्हणाले.संपूर्ण जग हे दहशतवादमुक्त विश्व व्हावे, ही सर्वसामान्य अमेरिकन जनतेची इच्छा असून भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या दहशतवादविरोधी लढ्याचे मी स्वागतच करतो, असे प्रतिपादन श्री ठाणेदार यांनी केले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे लोकानुनय करण्यामध्ये आघाडीवर असून मूळ अमेरिकन नागरिक हे त्यांचे समर्थक आहेत. या समर्थकांना खुश करण्यासाठी ट्रम्प वारंवार वेगवेगळ्या घोषणा करून निर्णय घेतात आणि पुन्हा त्या निर्णयांना मागे घेतात. अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार राष्ट्राध्यक्षांवर कारवाई होत नाही. तरीही आपण त्यांच्या प्रत्येक निर्णयावर टीका केली आहे. त्यामुळे भारतीय वंशाच्या मला मोठ्या प्रमाणात धमक्या, टीकांना सामोरे जावे लागत आहे, असे ते म्हणाले.
मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात अनेकदा आर्थिक अपयशाला सामोरे गेलो असलो तरी हार पत्करली नाही. पुन्हा व्यवसायात यशस्वी झाल्यावर अमेरिकेच्या राजकारणात उतरलो. वैयक्तिक खर्च करून निवडणूक लढतो. खासदार असलो तरी माझी संपत्ती अर्धी झाली असून माझी दोन्ही मुले नोकरी करतात, असे ठाणेदार यांनी वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना सांगितले.
वार्तालापाच्या अध्यक्षस्थानी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण होते. प्रास्ताविक उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर यांनी केले. यावेळी विश्वस्त राही भिडे, खजिनदार जगदीश भोवड, कार्यकारिणी सदस्य राजू खाडे उपस्थित होते

error: Content is protected !!