ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

परप्रांतीय महिलेचा मराठी बोलण्यास नकार घाटकोपर मध्ये हिंदी मराठी वाद


मुंबई : राज्यात सध्या मराठीचा मुद्दा चांगलाच गाजतोय. त्यातच मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी वाद समोर आला आहे. घाटकोपर पूर्वेमध्ये एका परप्रांतिय महिलेने मराठी बोलण्यास नकार दिला. इतकंच नाही तर तिच्याशी बोलणाऱ्या मराठी माणसांनाही तिनं हिंदी बोलायला सांगितलं. त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
घाटकोपर पूर्वमधील मदन केटरर्सच्या बाजूला असलेल्या दुकानाबाहेर काही लोक उभे होते. या दुकानातील मूळ बिहारच्या असलेल्या या महिलेने त्यांना हटकलं. तेव्हा मराठीत बोला असं ग्राहकांनी तिला सांगितलं. पण तिनं नकार दिला आणि वाद झाला.
आम्ही हिंदुस्तानात राहतोय, हिंदीमध्ये बोला असं म्हणत ती महिला भांडताना दिसत आहे. मराठीत नाही तर हिंदीतच बोलायचं असा दमही देताना ती दिसतेय. या घटनेचा व्हिडीओ अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून तो आता समोर आला आहे.
मुंबईमध्ये मराठी विरुद्ध हिंदी वाद
गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये मराठी विरुद्ध हिंदी वादाच्या अनेक घटना घडताना दिसत आहेत. राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी ही तिसरी भाषा असेल असं जाहीर केलं आणि त्यानंतर हा वाद अधिकच वाढल्याचं दिसून आलं. त्याच्याविरोधात दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र आवाज उठवला आणि सरकारने हा निर्णय मागे घेतला.
मिरा रोडमध्ये मराठी विरुद्ध हिंदी वाद शिगेला
मनसैनिकांनी मराठीच्या मुद्द्यावरुन मिरा रोडमधील एका व्यापाऱ्याला मारहाण केली होती. त्याच्या विरोधात मिरा भाईंदरमधील सर्व अमराठी व्यापा-यांनी ४ जुलैला आपली दुकाने बंद करुन, डीसीपी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेनेही ८ जुलैला मराठी अस्मितेसाठी मोर्चा काढला
मिरा रोडमधील सभेत हिंदीच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेत राज ठाकरेंनी फडणवीसांना थेट आव्हान दिलं. हिंदीसक्ती लागू करून दाखवाच, दुकानंच नाही तर शाळाही बंद करणार, असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी भाजप खासदार निशिकांत दुबेंचाही राज ठाकरेंनी समाचार घेतला. मुंबईत ये, समुद्रात डुबे डुबे के मारेंगे, असं म्हणत राज ठाकरेंनी दुबेंना प्रतिआव्हान दिलं. मराठी येत नसेल तर कानाखाली बसणारच, असं म्हणत राज ठाकरेंनी मराठीद्वेष्ट्यांनाही थेट इशारा दिला.

error: Content is protected !!