दार्जिलिंग/चारधाम यात्रेतील अतिशय महत्त्वाचे टप्पे असणाऱ्या केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिरांसंदर्भातील अतिशय महत्त्वाच्या वृत्तानं अनेकांचच लक्ष वेधलं आहे. बद्रीनाथ- केदारनाथ मंदिर समिती अर्थात बी के टी सी चे अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हेमंत द्विवेदी यांनी याबाबतच मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामध्ये वरील दोन्ही मंदिरं आणि बीकेटीसी अर्थात या समितीअंतर्गत येणाऱ्या सर्व मंदिरांमध्ये गैर हिंदुंना प्रवेशबंदी असेल असा उल्लेख आढळला. द्विवेदी यांच्या वक्तव्यासंदर्भात मंदिर समितीच्या आगामी बैठकीमध्ये समितीकडून त्याबाबतचा अधिकृत प्रस्ताव सादर केला जाणार आहे. इतकंच नव्हे तर द्विवेदी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या अवैध मकबरे हटवण्याच्या कारवाईचंही कौतुक केलं. देवभूमी उत्तराखंडच्या (Uttarakhand) धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचं रक्षण करणं, हीच सर्वोच्च प्राथमिकता असून केदार खंडापासून मानस खंडार्यंत स्थापित मंदिरांच्या शृंखलेमध्ये परंपरागत स्वरुपात गैर हिंदुंना प्रवेशबंदी करण्यात येत आहे. मात्र, भाजपेतर शासकांच्या कालावधीत या परंपरांचं उल्लंघन होत आलं असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. इतकंच नव्हे तर, परंपरांचं पालन सुनिश्चित करण्यासाठी ही पावलं उचलली जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्य शासन आणि बीकेटीसी यांच्यामधील उत्तम समन्वयातून देवभूमी उत्तराखंडचं पावित्र्य आणि परंपरांच्या संरक्षणासाठी अधिक प्रवावी पावलं उचलली जाती असा आश्वासक सूर आळवत द्विवेदी यांनी मंदिर समितीनं त्यादृष्टीकोनातून निर्णय घेण्यास सुरुवात केल्याचं म्हटलं. इतक्यावरच न थांबता त्यांनी पुष्कर सिंह धामी यांच्या सदरील भागांमध्ये असणारे अवैध मकबरे हटवण्याच्या कारवाईचंही कौतुक केलं. या कृतीमुळं उत्तराखंडची धार्मिक अस्मिता, सांस्कृतिक वारसा, कायदा आणि सुव्यवस्था आणखी बळकट करण्याच्या दृष्टीनं हे महत्वपूर्ण पाऊल असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तेव्हा आता देशविदेशातील भाविकांसाठी श्रद्धास्थानी असणाऱ्या केदारनाथ आणि बद्रीनाथच्या भाविकांकडून या निर्णयावर कोणत्या प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
