मुंबई :मुंबईतील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने मोठी मोहीम हाती घेतली असून, अनधिकृत फेरीवाले, अतिक्रमणे आणि पादचाऱ्यांच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या सर्व बाबींवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. ‘पेडेस्ट्रियन फर्स्ट अभियानाअंतर्गत पहिल्या टप्प्यात शहरातील ३२० किलोमीटर लांबीचे पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यात येणार आहेत.महापालिका मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत आयुक्त भिडे यांनी सर्व वॉर्ड स्तरावरील सहायक आयुक्तांना दररोज प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले. प्रत्येक कारवाईचा ‘बिफोर’ आणि ‘आफ्टर’ छायाचित्रांसह प्रगती अहवाल तपासणे बंधनकारक करण्यात आले आहे. विभागीय उपआयुक्तांनी साप्ताहिक, तर अतिरिक्त आयुक्तांनी दर पंधरा दिवसांनी या मोहिमेचा आढावा घ्यावा, असेही आदेश देण्यात आले.
आयुक्त भिडे यांनी स्पष्ट इशारा देताना सांगितले की, कर्तव्यात हलगर्जीपणा, दिरंगाई किंवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. आदेशांचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यात येईल.मुंबईतील जवळपास ५० टक्के नागरिकांचा दैनंदिन प्रवास पायी होत असल्याने पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. शाळा, रुग्णालये, रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानके, बसस्थानके, बाजारपेठा आणि गर्दीच्या परिसरातील पदपथ तातडीने अतिक्रमणमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पदपथांवरील बांधकाम साहित्य, राडारोडा, बेवारस वाहने, कचऱ्याचे ढीग, अनधिकृत जाहिरात फलक, होर्डिंग्ज, बाहेर उघडणारे दरवाजे, नियमबाह्य रॅम्प आणि इतर सर्व अडथळे हटविण्यात येणार आहेत. परवानाधारक विक्रेत्यांनीही केवळ मंजूर जागेतच व्यवसाय करावा, याची नियमित पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याशिवाय नवीन पदपथांचे बांधकाम केवळ निर्धारित मानकांनुसार एम-४० दर्जाच्या काँक्रीटमध्येच करण्यात येईल. पेव्हर ब्लॉक किंवा स्टॅम्प काँक्रीटचा वापर टाळण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. पदपथावरील खड्डे, पातळीतील तफावत आणि इतर अडथळेही दूर करण्यात येणार आहेत.आयुक्त भिडे यांच्या मते, पदपथ अतिक्रमणमुक्त झाल्यास विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षितपणे चालता येईल. यामुळे रस्ते अपघात कमी होतील, वाहतूक कोंडी कमी होईल आणि शहरातील हवेच्या गुणवत्तेतही सुधारणा होण्यास मदत होईल.महापालिकेने सर्व विभागांना प्राधान्यक्रमानुसार पदपथांची यादी तयार करून अतिक्रमणे पुन्हा होणार नाहीत यासाठी सातत्यपूर्ण देखरेख ठेवण्याचे आदेश दिले असून, “पदपथांवर अडथळे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर थेट कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशाराही आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिला आहे.

