धक्कादायक! कृषीमंत्र्यांचा सभागृहातच ऑनलाईन रमीचा डाव – विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी
मुंबई/भ्रष्टाचाराच्या प्रकरणात २ वर्षांची शिक्षा होऊनही मंत्रिपदावर असलेले ,आणि कृषी खाते म्हणजे ओसाड गावची पाटीलकी! असे म्हणत शेतकऱ्यांच्या विरोधात वेगवेगळी विधाने करणारे, राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहातच मोबाईलवर रमी खेळण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे . महाराष्ट्रात कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा विरोधकांनी लावून धरलेला असतानाच, कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गांभीर्याने विचार करण्याऐवजी, रमी खेळत असतील तर अशा कृषिमंत्र्याची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे . दरम्यान कृषीमंत्र्यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत.
राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा वादात अडकले होते. आता विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नुकतेच संपले असून या अधिवेशनात ते सभागृहातच मोबाइलवर रमी गेम खेळत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा सदर व्हिडीओ एक्सवर शेअर केला होता. त्यानंतर विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार टीका केली. यानंतर आता खुद्द माणिकराव कोकाटे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच आपण सभागृहात गेम खेळत नव्हतो, असे स्पष्टीकरण दिले आहे.
महायुती सरकार मधील मित्र पक्षांचे मंत्री रोज नव्या नव्या भानगडी करून मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढवत आहेत भ्रष्टाचाराच्या प्रकरणात न्यायालयाकडून 2 वर्षांची शिक्षा होऊनही मंत्रिपदावर कायम असलेले अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री आहेत.पण कृषी मंत्री असूनही ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गांभीर्याने विचार करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या विरोधातच बोलत असतात.राज्य सरकारच्या पिक विमा कर्ज योजनेवर बोलताना १ रुपया भिकारी सुधा घेत नाही असे विधान त्यांनी केले होते.तसेच शेतकऱ्यांच्या अंगावरचे कपडे आणि आम्ही दिलेला आहे.शेतकरी कर्ज घेऊन मुलाबाळांच्या साखरपुडा आणि लग्नावर पैसे खर्च करतात.नुकसान भरपाई कसली शेतातल्या ढेकलांचे पंचनामे करायचे का ? अशी अनेक वादग्रस्त विधाने कोकाटे यांनी केली आहे.त्यांच्या या वादग्रस्त विधानांबाबत एकदा त्यांचे नेते अजित पवार यांनी जाहीरपणे कोकाटेना कानपिचक्या दिल्या होत्या.पण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही या म्हणी नुसार कोकाटे काही सुधारले नाहीत . आणि आता मोबाईल वर सभागृहातच रमी खेळताना सापडल्याने आता त्यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार आहे.
दरम्यान आपल्यावर झालेल्या आरोपांबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देताना कृषिमंत्री कोकाटे म्हणाले “मी विधानपरिषदेत कामकाजासाठी बसलो होतो. तेव्हा सभागृह काही वेळासाठी तहकूब झाले असावे. म्हणून मी खालच्या सभागृहात (विधानसभेत) काय कामकाज सुरू आहे, हे पाहण्यासाठी मी युट्यूबवर गेलो होतो. युट्यूबवर व्हिडीओ सुरू केल्यानंतर जाहिराती येत असतात. त्याप्रमाणेच त्यावेळी सदर जाहिरात आली. मी जाहिरात स्किप करून पुढे गेलो. पण व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांनी फक्त १८ सेकंदाचाच व्हिडीओ दाखवला.माझ्यावर विरोधी पक्ष वैयक्तिक टीका करतो. कधी माझ्या कपड्यांवर कधी एखाद्या विधानावर टीका केली जाते. पण माझ्या धोरणांवर, कामावर किंवा मी शेतकऱ्यांसाठी केलेल्या उपाययोजनांवर विरोधी पक्ष कधीही बोलत नाही. माझे काम पारदर्शी आहे, माझा स्वभाव स्पष्ट आहे. विधिमंडळाच्या सभागृहात कॅमेरे आहेत. तिथे अनुचित प्रकार करू नये, याची मला पूर्ण कल्पना आहे. मग मी गेम का खेळेल?असा सवाल त्यांनी केला.
