मुंबई:
पादचाऱ्यांना पदपथांवरून सुरक्षित व सुलभपणे मार्गक्रमण करता यावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत शिवडी परिसरात मोठी निष्कासन कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागाकडून डी. जी. महाजनी मार्ग आणि जेरबाई वाडीया मार्गालगतच्या पदपथांवर ही धडक मोहीम राबवण्यात आली. या कारवाईदरम्यान प्रशासनाने पदपथांवरील अवैध कब्जा हटवत ७ अनधिकृत दुकाने, १५ तात्पुरते ताडपत्रीचे शेड, २ अनधिकृत कट्टे, ४ बेवारस साहित्य साठवण ठिकाणे आणि २० फेरीवाल्यांवर कठोर कारवाई केली. या मोहिमेमुळे हे पदपथ आता पूर्णपणे अडथळामुक्त करण्यात आले आहेत.
माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पेडेस्ट्रियन फर्स्ट’ अभियान वेगात राबविण्यात येत आहे. पदपथांवरील अतिक्रमणे व अनधिकृत फेरीवाल्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना चालताना निर्माण होणारे अडथळे दूर करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. उपायुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त (एफ दक्षिण विभाग) वृषाली इंगुले यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण कारवाई पार पडली. कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
शिवडीत अनधिकृत स्टॉल आणि दलालांचा सुळसुळाट; नागरिकांची वाढती डोकेदुखी
शिवडी परिसरात पदपथांवर परप्रांतीयांचे आणि स्टॉलधारकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या अनधिकृत स्टॉलमुळे पदपथ पूर्णपणे गहाण पडले असून नागरिकांचे चालणे मुश्किल झाले आहे. परिसरात तब्बल १०० ते १५० अनधिकृत स्टॉल उभारण्यात आले असून, विनापरवाना विजेचा वापर आणि व्यावसायिक अतिक्रमणामुळे समस्या बिकट झाली आहे.
केवळ मोजक्याच ठिकाणी झालेली कारवाई अपुरी असून, पालिका अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून रस्ते मोकळे करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण गैरव्यवहारात दलाल सक्रिय असून, ते हप्ते गोळा करून पालिका अधिकारी आणि स्थानिक विरोधकांना मॅनेज करण्याचे काम करत असल्याचा गंभीर संशय नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
