मुंबईसह कोकण पट्ट्यात मान्सूनचे आगमन माघारी परतल्यानंतर आता तापमानात मोठी वाढ झाली आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा देण्यात आला असून, प्रशासनाने या सर्व भागांत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
गेल्या काही दिवसांत मुंबईचे कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. वाढत्या तापमानासोबत हवेतील आर्द्रता जास्त असल्यामुळे नागरिकांना प्रचंड उष्ण व दमट (Humid) हवामानाचा सामना करावा लागत आहे. अंगाची लाही लाही करणाऱ्या या उकाड्याममुळे मुंबईकरांच्या घामाच्या धारा वाहत असून दैनंदिन जीवनही प्रभावित झाले आहे.
या उष्ण व दमट हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः दुपारच्या वेळी कडक ऊन आणि उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे डिहायड्रेशन, चक्कर येणे किंवा उष्माघाताचा (Heatstroke) धोका वाढू शकतो. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आणि आरोग्य विभागाने नागरिकांना अत्यंत गरजेशिवाय दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच बाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी, हलके व सुती कपडे वापरावे आणि स्वतःचे संरक्षण करावे, असे सुचवण्यात आले आहे.
