परभणी/ महाराष्ट्रात इतरत्र सत्तेसाठी सर्वच पक्षांनी आपल्या मूळ ध्येय धोरणाला तिलांजली दिलेली असली तरी परभणीत मात्र ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेस बरोबर हातमिळवणी करीत महाविकास आघाडी अजूनही जिवंत असल्याचे दाखवून दिले.परभणीत महापौर पदाच्या निवडणुकीत ठाकरेंच्या सेनेने भाजपाचे मनसुबे उधळून लावले.त्यामुळेच ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इकबाल सय्यद ख्वाजा हे महापौर बनले तर काँग्रेसचे गणेश देशमुख उपमहापौर बनले आहेत.
परभणी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज पार पडलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे इकबाल सय्यद खाजा यांनी महापौरपदावर बाजी मारली आहे. तर उपमहापौरपदी काँग्रेसचे गणेश देशमुख यांची निवड झाली आहे
महापौर निवडणुकीपूर्वीच सत्तासमीकरण स्पष्ट झाले होते. शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस यांच्यातील समन्वयानुसार महापौरपद शिवसेनेकडे, तर उपमहापौरपद काँग्रेसकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शिवसेनेकडून सय्यद इकबाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते, तर काँग्रेसने उपमहापौर पदासाठी गणेश देशमुख यांचे नाव अधिकृत केले होते. महापौर निवडीसाठी शिवसेनेने आपल्या नगरसेवकांना व्हीपही बजावला होता.
गुरुवारी झालेल्या निवडणुकीत हात उंचावून मतदान घेण्यात आले. महापौर पदासाठी झालेल्या मतदानात शिवसेनेचे उमेदवार सय्यद इकबाल सय्यद खाजा यांना ३९ मते मिळाली, तर भाजपच्या उमेदवार तिरुमला मोकिंद खिल्लारे यांना २६ मते मिळाली. स्पष्ट बहुमत मिळवत सय्यद इकबाल यांनी महापौरपद पटकावले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अक्षय देशमुख आणि रजिया बेगम यांनी भाजपला मतदान केले नाही, ही बाबही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरली.
निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि काँग्रेसचे एकूण ३७ नगरसेवक एकत्रितपणे महानगरपालिकेच्या सभागृहाकडे रवाना झाले होते. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांचे नगरसेवक एकाच बसमधून सभागृहाकडे गेल्याने आघाडीतील एकजूट ठळकपणे दिसून आली. मतदानापूर्वी सर्व नगरसेवक मोरया लॉन्सच्या सभागृहात एकत्र बसले होते, त्यानंतर निवड प्रक्रिया पार पडली.
परभणी महानगरपालिकेच्या उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे गणेश देशमुख यांनी १०मतांनी विजय मिळवला. गणेश देशमुख यांना ३७मते, तर राष्ट्रवादीच्या उमेदवार नाजमा अब्दुल रहीम यांना २७ मते मिळाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक अक्षय देशमुख यांनी तटस्थ भूमिका घेतली. उपमहापौरपदी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाल्याने महाविकास आघाडीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.
चौकट
एकूण जागा ६५
शिवसेना ठाकरे : २५
काँग्रेस : 12
भाजपा: 12
राष्ट्रवादी काँग्रेस : 11
जनसुराज्य शक्ती : 3
यशवंत सेना : 1
इतर : 1
