मुंबई/मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात आता लहान मुलेही सुरक्षित राहिलेली नाहीत, याची प्रचिती देणारी एक धक्कादायक घटना कांदिवली पूर्व भागात घडली आहे. क्रांती नगरमधील कर्नाटक चाळ गल्लीत एका ७ वर्षांच्या चिमुरडीवर भरदिवसा ब्लेडने हल्ला करून तिचे सोन्याचे लॉकेट लुटण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण कांदिवली परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी काल दुपारी १ वाजेच्या सुमारास आपल्या घरापासून शाळेच्या दिशेने निघाली होती. ती कर्नाटक चाळ गल्लीतून जात असताना दबा धरून बसलेल्या एका अज्ञात नराधमाने तिला अडवले. आरोपीने अचानक मुलीच्या हातावर ब्लेडने वार केले. या अनपेक्षित हल्ल्यामुळे मुलगी रडू लागली आणि गोंधळली. याचाच फायदा घेत आरोपीने तिच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट हिसकावून घेतले. यानंतर गर्दीचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.या हल्ल्यात चिमुरडीच्या हाताच्या अंगठ्याला मोठी आणि खोलवर जखम झाली आहे. रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या मुलीला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. जिथे तिच्यावर उपचार करण्यात आले. या घटनेमुळे ती प्रचंड मानसिक धक्क्याखाली आहे. शाळेत जाताना आमच्या मुलांवर असे हल्ले होत असतील, तर आम्ही त्यांना पाठवायचे कसे? असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.

