श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री भीषण स्फोट झाला. यामध्ये ७ पोलिसांसह ९ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत. जप्त केलेली स्फोटकं हाताळताना पोलीस स्टेशनमध्ये हा अपघात घडल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या घटनेची चौकशी सुरु असून दहशतवादी हल्ल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
दक्षिण श्रीनगरमधील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा एक शक्तिशाली स्फोट झाला. या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.प्रत्यक्षदर्शी आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्फोटामुळे इमारत हादरल्याचे आणि आगीचे लोळ आणि दाट धूर हवेत पसरल्याचे दिसून आले. अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. जखमींपैकी अनेक जण गंभीर अवस्थेत आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध बचाव पथकांकडून सुरू आहे.स्फोटाची तीव्रता इतकी होती की मृतदेहाचे तुकडे घटनास्थळापासून ३०० फूट दूरपर्यंत सापडले. स्फोटाची दोन संभाव्य कारणे तपासली जात आहेत. एक म्हणजे, मॅजिस्ट्रेटच्या उपस्थितीत अमोनियम नायट्रेट सील करताना ते पेटले असावे. दुसरे कारण म्हणजे दहशतवादी हल्ला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरीदाबादमधून आणलेले स्फोटक पोलीस आणि फॉरेन्सिक टीम हाताळत असताना हा स्फोट झाला. दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात जप्त केलेल्या ३५० किलो स्फोटकांपैकी मोठा साठा या पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आला होता. काही जप्त केलेले रसायन पोलीस फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले होते, परंतु मोठा साठा स्टेशनमध्येच होता.

