धाराशिव/राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाली असताना, दुसरीकडे शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे ४ दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर पोहोचले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारची मदत मिळाली की नाही, शेतकऱ्यांना शासकीय मदत किती मिळाली, याचा आढावाच ते या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेत आहेत. उद्धव ठाकरेंनी आज धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भेट घेत सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, जूनची कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. जोपर्यंत कर्जमुक्ती नाही, तोपर्यत सरकारला मत नाही हे बोर्ड लावा, निश्चय करून टाका आणि सगळीकडे बोर्ड असा लावा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना केलंय.
धाराशिव येथे शेतकऱ्यांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही शेतकरी आहात ना? नाहीतर सरकारचे लोक म्हणतील मुंबईतून लोक आणली आणि टोप्या घालून बसवली. मला सभा घ्यायची नाहीय, मी तुमच्याशी बोलायला आलोय. मुख्यमंत्री म्हणाले इतिहासतली सगळ्यात मोठी थाप आहे. तुमच्या पॅकेजला खेकड्याने भोक पाडली का? पॅकेजचं काय झालं? मदत का मिळाली नाही? अशी टीका उद्धव ठाकरेंनी धाराशिव दौऱ्यातून सरकारवर केली. हे सरकार दगाबाज सरकार आहे, या सरकारशी दगाबाजी केली पाहिजे. निवडणूक आली म्हणून मी आलोय म्हणताय, अरे आपत्ती आलीये ती थोडीच थांबली? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
विमा कंपन्याना सांगतो की, शेतकऱ्यांची सगळी रक्कम द्या, नाहीतर हे सगळे तुमच्या ऑफिसवर येतील. फसल योजनेमध्ये तुम्हाला फसवलं आहे, फसलमध्ये फसवलं आहे. कैसन बा? अरे येथे तुझा बा शेतकरी बसलाय ना? लाडकी बहीणमध्ये सगळ्यांना पैसे मिळत होते आता कुटुंबातील दोघांनाच पैसे मिळत आहेत. एक अनर्थ मंत्री, एक गृह कलह मंत्री आणि एक नगरभकास मंत्री हे आपले मंत्री आहेत, अशा शब्दात ठाकरेंनी महायुती सरकारवर टीका केली. अजित पवार म्हणताय तुम्ही हात पाय हलवा, अरे तुम्ही हलवा ना, शेतकरी भीक मागायला सरकाराच्या दारात येत नाही. जूनमध्ये कर्जमुक्ती काय करताय, अरे माणूस आत्ता आजारी आहे. आत्ता द्या, नंतर देऊन काय उपयोग? आत्ता निवडणूक येत आहे, सरकार हिंदू-मुस्लिम करतील, मराठी-अमराठी करतील, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

