अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्याला सरकारकडून १२८ कोटी ५५ लाखांची मदत जाहीर
परभणी/मागील चार महिन्यांपासून परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. त्यामुळे खरिपाच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नदी, नाल्यांना पूर आल्यामुळे नदीपात्रा लगतच्या जमिनीचे देखील प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्याच अनुषंगाने आज राज्य सरकारने शासन निर्णय काढून अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी तब्बल १२८ कोटी ५५ लाख रुपयांच निधी मंजूर केला आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये हस्तांतरित करण्याबाबतचा आदेश देखील याच शासन निर्णयात देण्यात आलेला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलीच मदत होणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
परभणीजिल्ह्यामध्ये यावर्षीच्या मान्सूनमध्ये जून पासूनच मोठ्या प्रमाणावर पाऊस पडू लागला होता. जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये तब्बल ५७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये आत्तापर्यंत जवळपास १३७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. परभणी जिल्ह्यात आत्तापर्यंत तब्बल ६८८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. आणि तो वार्षिक सरासरीच्या तब्बल १०२% एवढा आहे.अद्यापही पावसाळा आणखीन शिल्लकच आहे. पाऊस केवळ मोठ्या प्रमाणावरच पडला नाही तर काही भागात सतत पाऊस पडला. तर काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. ज्यामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले. ओढ्या, नाल्याला, नदीला पूर आला आणि त्या पुराच्या पाण्यामुळे देखील शेतीचे अतोनात नुकसान झाले. आणि शेतकऱ्यांचे खरिपाचे हाताशी आलेले पीक वाया गेले.