लाडक्या बहिणींना इ/ के वाय सी बंधनकारक
मुंबई/अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेबाबत महत्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींना आता इ / के वाय सी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर इ /के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील दोन महिन्यांच्या आत सदर इ के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी अशी नम्र विनंती अदिती तटकरे यांनी केली आहे. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार असल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी ट्वीटरवर पोस्ट करत लाडकी बहिण योजनेसंदर्भाती महत्वाची अपडेट दिली आहे. लाडकी बहिण योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी इ / के वाय सी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. याबाबत शासन निर्णयाचे परिपत्र देखील जारी करण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांची पडताळणी आणि प्रामाणिकरण करण्यात येणार आहे. दरम्यान, दोन महिन्यात इ / के वाय सी न केल्यास पुढील होणाऱ्या कारवाईस ते जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी अशी माहिती देखील परिपत्रकात देण्यात आली आहे. त्यामुळं लाडकी बहिण योजनेतील सर्व पात्र महिलांनी तातडीने आपली ईकेवायसी पूर्ण करावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
