मुंबई/बॉलिवूडचे ही-मॅन, प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचं आज सकाळी ९.३०च्या सुमारास निधन झालं आहे. वयाच्या८९ व्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना दोन आठवड्यापूर्वी रुग्णालयात दाखलही करण्यात आलं होतं. प्रकृतीत फरक पडल्याने त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. पण आज सकाळी त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या निधनाची त्यांच्या कुटुंबियांनी अधिकृत घोषणा केलेली नाहीये. पण त्यांचं संपूर्ण कुटुंब विलेपार्ले येथील स्मशानभूमीत पोहोचलं आहे. तसेच बॉलिवडूचे अनेक कलाकारही स्मशानभूमीत दाखल झाले आहेत. प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि आमिर खान हे सुद्धा धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप देण्यासाठी स्मशानभूमीत आले होते.
धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करीत पंतप्रधान मोदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या शोक संदेशात त्यांनी म्हटले आहे धर्मेंद्रजींच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे. ते चित्रपटसृष्टीतील एकमेवाद्वितीय असं व्यक्तिमत्व होते. ते एक असाधारण असे अभिनेता होते, ज्यांनी त्यांच्या प्रत्येक भूमिकेमध्ये एक खोली आणि आकर्षकता आणली.त्यांनी विविध भूमिका ज्या पद्धतीने साकारल्या त्या असंख्य लोकांच्या मनाला भिडल्या. धर्मेंद्रजी त्यांच्या साधेपणा, नम्रता आणि आपलेपणासाठी तितकेच प्रशंसनीय होते. या दुःखाच्या वेळी, माझे विचार त्यांच्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत आणि असंख्य चाहत्यांसोबत आहेत. ओम शांती.”
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही सोशल मीडिया साइट ‘एक्स’वर पोस्ट करत लिहिलंय की, “ज्येष्ठ अभिनेते आणि माजी खासदार धर्मेंद्रजी यांचं निधन भारतीय चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान आहे. सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असलेल्या त्यांनी त्यांच्या दशकांच्या शानदार कारकिर्दीत अनेक संस्मरणीय कामगिरी केल्या.”
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असल्याचे म्हटले आहे.त्यांनी म्हटलंय की, “एक्स वर पोस्ट करताना त्यांनी लिहिले की, “महान अभिनेते धर्मेंद्रजी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे आणि भारतीय कला जगताचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे.”

