बुलढाणा : बुलढाणा येथील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड आणि नातेवाईक श्रीकांंत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. स्थानिक नागरिकांनी पकडलेल्या बोगस मतदाराला ( पोलिसांच्या तावडीतून पळवून लावण्यास मदत केल्या प्रकरणी कुणाल गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिली आहे
बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र असलेल्या कुणाल गायकवाड व नातेवाईक असलेला श्रीकांत गायकवाड यांच्यावर बुलढाणा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. बोगस मतदाराला पोलिसांच्या ताब्यातून पळवून लावण्यास कुणाल गायकवाड मदत करत असल्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. यामुळं या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरु झाली होती. अखेर कुणाल गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय तांत्रिक संस्था येथील मतदान केंद्रावरून पोलीस अंमलदाराच्या ताब्यातून एका बोगस मतदाराला पळवून नेण्यास मदत करणे व शासकीय कामात अडथळा आणणे या कारणासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड या दोघांवर कलम 132, 49, 351 – 2-3-5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळं बुलढाण्यात राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

