जनतेला दिलासा देण्यासाठी जीएसटी स्लॅब मध्ये बदल
नवी दिल्ली/सणासुदीच्या काळात, दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आधी असलेल्या जीएसटीच्या चार स्लॅबपैकी १२टक्के आणि २८टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्यात आला. त्यामुळे देशात आता फक्त ५ टक्के आणि १८ टक्के असेल दोनच जीएसटी स्लॅब असतील. सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ, साबण, कपडे, पादत्राणे यासह रोजच्या वापराच्या गोष्टी स्वस्त होणार आहेत. सरकारचा हा निर्णय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, म्हणजे 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे.
नवी दिल्लीत जीएसटी कौन्सिलची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला. स्वातंत्र्यदिनीच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीमध्ये बदल होणार असे सांगितले होते. त्यावर आता बैठकीत निर्णय झाला.
देशात लागू असलेल्या १२ टक्के आणि २८ टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ज्या गोष्टींवर आधी २८ टक्के जीएसटी लागायचा त्यावर आता १८ टक्के जीएसटी लागणार आहे. त्याचबरोबर ज्या गोष्टींवर आधी १२ टक्के जीएसटी लागायचा, त्यावर आता पाच टक्के जीएसटी लागणार आहे. तर काही वस्तूंवरील जीएसटी हा शून्य टक्के करण्यात आला आहे.
सर्व प्रकारच्या रोटी, पनीर, प्रोसेस्ड दुधावरील कर पूर्णपणे रद्द.
दैनंदिनी जीवनातील वस्तूंवर ५% स्लॅब लागू.
कृषी उत्पादनांवरील जीएसटी १२% वरून 5% मध्ये आणला. शेतकऱ्यांच्या वापरातील बहुतांश वस्तूंवरील करात घट.
घर आणि बांधकाम साहित्य मध्यमवर्गासाठी दिलासा; सिमेंट २८% वरून १८% वर आणले.
कॅन्सर आणि रेअर ड्रग्सवर जीएसटी कमी.
ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठा दिलासा; आता जीएसटी फक्त १८%.
बस, ट्रक, अॅम्ब्युलन्स, थ्री-व्हीलर आणि ऑटो पार्ट्स यांवर कर घटला.
साबण, टूथपेस्ट, शॅम्पू यांसारख्या वस्तूंवरील जीएसटी १८% वरून ५% किंवा 0% करण्याची तयारी.
इंडिव्हिज्युअल हेल्थ, लाइफ व रिइन्शुरन्स पॉलिसींवरील कर पूर्णपणे रद्द.
टर्म लाइफ, यू एक आय पी, एंडोमेंट पॉलिसी, फ्लोटर पॉलिसी व वरिष्ठ नागरिकांसाठीच्या पॉलिसींवर पूर्ण सूट.
सिन गुड्स जसे की पान मसाला, तंबाखू तसेच अल्ट्रा लक्झरी वस्तूंवर हा ४० टक्के कराचा स्लॅब लागू होणार.
