पाटणा: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या मतदार अधिकार यात्रेदरम्यान बिहारमधील दरभंगा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या दिवंगत आईला उद्देशून शिवीगाळ झाल्याचे तीव्र पडसाद येथे उमटले. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बिहार प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात घुसून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले. दरम्यान, राहुल गांधी यांनीही या घटनेची दखल घेऊन, ‘सत्यमेव जयते’ या प्रतिक्रियेद्वारे प्रत्युत्तर दिले.
काँग्रेसच्या मतदार अधिकार यात्रेदरम्यान दरभंगा शहरात हा प्रकार घडला होता. यामुळे भाजपचे नेते व कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना होती. बिहारचे मंत्री व भाजपचे नेते नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या प्रदेश कार्यालयापासून सदाकत आश्रम या काँग्रेसच्या प्रदेश मुख्यालयापर्यंत शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला.पंतप्रधान मोदी यांना उद्देशून केलेले अवमानकारक वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही. राहुल गांधी व त्यांच्या मित्रपक्षांच्या नेत्यांनी या प्रकरणी माफी मागायलाच हवी,’ अशी प्रतिक्रिया नवीन यांनी दिली. हा मोर्चा काँग्रेसच्या मुख्यालयापर्यंत पोहोचताच वातावरण आणखी तापले. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या मुख्यालयात शिरून तेथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले

.
