सपा आणि काँग्रेसने माफियाना साथ दिली संभल ची डेमोक्रसी बदलण्याचा प्रयत्न केला – योगींचा विरोधकांवर आरोप
लखनौ/समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या कार्यकाळात हिंदूंना ठरवून लक्ष्य करण्यात आले. तेव्हा, हिंदूंची लोकसंख्या कमी करून डेमोग्राफी बदलण्याचा कट रचण्यात आला. आज हे डबल इंजिनचे सरकार कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारची फुटीर राजकारण होऊ देणार नाही. जे कुणी राज्यातील डेमोग्राफी बदलण्याचा प्रयत्न करेल, त्याला स्वतःलाच पलायन करावे लागेल, अशा शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सपा आणि काँग्रेसवर थेट निशाणा साधला. त्यांनी शुक्रवारी प्रतापगड येथे एका सभेला संबोधित केले. यावेळी, संभलमधील २०२४ च्या हिंसाचारासंदर्भात आलेल्या न्यायिक आयोगाच्या अहवालाचा हवाला देत ते बोलत होते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रतापगड येथील ५७० कोटी रुपयांच्या १८६ विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी प्रसंगी जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले, विकास कामे पाहून विरोधक भयभीत झाले आहेत. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची ‘इंडिया आघाडी’ प्रत्यक्षात ‘अँटी इंडिया’ आघाडी आहे. ही आघाडी भारताच्या स्वाभीमाशी खेळत आहे आणि जाती-धर्माच्या नावावर देशाचे विभाजन करण्याचे काम करत आहे. त्यांना जेव्हा-जेव्हा सत्ता मिळाली, तेव्हा-तेव्हा त्यांनी माफियांना प्रोत्साहन दिले, गुंडगिरी केली आणि गरिबांचे हक्क ओरबडून घेतले. आता जनतेने त्यांना नाकारले आहे. असेही योगिनी सांगितले.
