मुंबई/महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. आज आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते. या भेटींच्या चर्चा सुरु असतानाच उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून कोणाला संधी द्यायची याचा निर्णय घेतला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे.सूत्रांच्या माहितीनुसार राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं त्यांच्या कोट्यातून एक स्वीकृत नगरसेवकपद मनसेला देण्याची मागणी केली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याकडून तीन जणांची नावं स्वीकृत नगरसेवक म्हणून निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. यामुळं मनसेला ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवकपद दिलं जाणार नसल्याच्या चर्चा सुरु आहेत. २८ फेब्रुवारीला स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी (१८ फेब्रुवारी)ला मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी नंदनवन या ठिकाणी भेट घेतली होती. या भेटीत दोन्ही नेत्यांवर सी विविध मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची ही पहिली भेट होती मुंबई महापालिका निवडणूक भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना महायुती म्हणून लढले. तर, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांनी आघाडी करत निवडणूक लढवली. मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या आघाडीनं ७१ जागा मिळवल्या. ठाकरेंच्या शिवसेनेला ६५ आणि मनसेला ६ जागांवर विजय मिळाला. दुसरीकडे भाजपनं ८९, एकनाथ शिंदेंची शिवसेना २९ जागा जिंकून सत्तेत आली. एमआयएमनं ८ जागांवर विजय मिळवला. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ३ जागांवर विजयी झाली.तर, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवर विजयी झाली. समाजवादी पक्षानं २ जागांवर विजय मिळवला.
दरम्यान, भाजप शिवसेनेच्या महायुतीकडून रितू तावडे यांना महापौरपदी संधी देण्यात आली आहे. तर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संजय घाडी यांना उपमहापौर करण्यात आलं आहे. किशोरी पेडणेकर यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं आहे.

