गडचिरोली/मुरूम उत्खनन प्रकरणी एका मजुराला बेदम मारहाण केल्याच्या आरोपावरून आरमोरी विधानसभेचे काँग्रेसचे आमदार रामदास मसराम
यांच्यासह सहा जणांविरुद्ध देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल विकास राजगडे असे मजुराचे नाव असून तो गंभीर जखमी असल्याने त्याच्यावर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, मारहाण केल्याचे वृत्त खोटे असल्याचे आमदार महोदयांनी म्हटले आहे.
जिल्ह्यातील कोंढाळा येथे रेल्वेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मंगळवारी मध्यरात्री मुरुम उपसा सुरू असताना आमदार मसराम आपल्या पाच सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. येथे मुरुम उत्खनन कसे काय सुरू आहे, अशी विचारणा करत त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या मजुरांशी हुज्जत घातली. यावेळी कुणालने तहसील कार्यालयाची रीतसर परवानगी असल्याचे सांगत, कंत्राटदाराकडे चौकशी करण्याचा सल्ला दिला. यावरून वाद विकोपाला गेला आणि चिडलेल्या जमावाने काठीने व हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप कुणालने तक्रारीत केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आमदार रामदास मसराम यांच्यासह निवृत्त शिक्षक धनपाल मिसार, अमोल मिसार, सागर वाढई, ज्ञानदेव पिलारे आणि चालक विजय भुरले यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.दरम्यान, मुरुम उत्खननाबाबत स्थानिक शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्या होत्या. लोकप्रतिनिधी म्हणून वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी मी सहकाऱ्यांसह तिथे गेलो होतो. मजुराला मारहाण केल्याचा आरोप खोटा आहे. उलट आम्ही याबाबत विचारणा केली असता, तिथल्या लोकांनीच वाद घालून आमच्या अंगावर धावून येण्याचा प्रयत्न केला, अशी प्रतिक्रिया रामदास मसराम यांनी संबंधित घटनेबाबत बोलताना दिली.

