१५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निकाल
मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्या बाबत निवडणूक आयोगाने हात झटकले
मुंबई/अखेर मुंबई-ठाण्यासह राज्यातील प्रलंबित महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल १६ जानेवारी रोजी लागणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. राज्यातील २९ महापालिकांसाठी ३ कोटी ४८ लाख मतदार मतदान करणार आहेत
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका या गेल्या पाच ते सात वर्षांपासून किंवा त्या पेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. त्यामध्ये सुरुवातीला २ डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या. आता त्यानंतर राज्यातील प्रलंबित २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
नामनिर्देशन पत्र स्वीकारणे – २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर,
अर्जाची छाननी – ३१डिसेंबर,
उमेदवारी माघारीची मुदत – 2 जानेवारी, चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी – 3 जानेवारी,
मतदान – १५ जानेवारी
निकाल – १६ जानेवारी
राज्यातील २७ महापालिकांची मुदत संपली आहे. त्यासोबत जालना आणि इचलकरंजी या दोन नवीन महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या महापालिका निवडणुकांसाठी १जुलै २०२५ रोजीची मतदान यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आली असल्याने त्यामध्ये नावे वगळण्याचे अधिकार राज्य आयोगाला नाहीत असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
एकूण मतदार – ३.४८ कोटी
मतदार केंद्र – ३९,१४७
मुंबईसाठी मतदार केंद्र -१०,१११
कंट्रोल यूनिट -११,३४९
बॅलेट युनिट – २२,०००
मुंबई महापालिकेमध्ये एक सदस्यीय वॉर्ड असल्यामुळे मतदारांना एकच मत द्यावं लागणार आहे. तर उर्वरित २८ महापालिकांसाठी एक ते पाच सदस्यीय वॉर्ड असल्याने त्यानुसार मतदान द्यावं लागणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहे. तसेच ज्या उमेदवारांकडे सध्या जात वैधता प्रमाणपत्र नाही त्यांना निवडणुकीपासून सहा महिन्यांच्या आत सादर करावं लागणार आहे.
मतदार जनजागृतीसाठी रील तयार करण्यात आले आहेत. जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी मतदार केंद्रावर आवश्यक त्या सुविधा असतील. मतदान केंद्रावर रँप आणि व्हील चेअर असतील.
राज्यातील १,९६,६०५ कर्मचारी या निवडणुकीसाठी काम करतील. मतदानाच्या आधी ४८ तास प्रचारावर बंदी असेल. तसेच त्या दरम्यान जाहिरातींवरही बंदी असेल. महापालिका निवडणूक नियमांनुसार ही बंदी असेल राज्यातील २९ महापालिकांसाठी एकूण २८६९ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामध्ये १४४२ महिला सदस्य, ७५९ इतर मागासवर्गीय सदस्य, ३४१अनुसूचित जाती तर ७७ सदस्य हे अनुसूचित जमातीचे सदस्य असतील.
मुंबईत ११ लाख संभाव्य दुबार मतदार आहेत. एकूण मतदारांचा विचार करता ती सात टक्के इतकी असल्याचं समोर आलं आहे. या दुबार मतदारांची ओळख केली असून त्यांच्या नावासमोर दोन स्टार असतील. त्यांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलं आहे आणि मतदान कुठे करणार हे त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात आले आहे. ज्यांचा सर्व्हे झाला नाही त्यांच्याकडून मतदान केंद्रावर हमीपत्र घेतल जाईल.

