बोरिवली: बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात काही वनअधिकाऱ्यांनी मद्यपान केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मिडीयावरती व्हायरल झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संरक्षण चौकीसारख्या ठिकाणी वनअधिकारी मद्यपान करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा व्हिडिओ कोणी रेकॉर्ड केला आणि तो कसा व्हायरल झाला, याचाही शोध घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
संचालिका अनिता पाटील यांनी निवेदनाद्वारे याबाबतची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासली जाणार असून चुकीचे प्रकार घडत असतील तर ते नक्कीच थांबवले पाहिजेत. तसेच हा व्हिडिओ कोणत्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आला, याची माहिती गोळा करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी नमूद केले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईतील अत्यंत महत्त्वाचे पर्यावरणीय क्षेत्र असल्याने या प्रकरणाची चौकशी तातडीने पूर्ण करून संबंधितांवर आवश्यक ती कारवाई केली जाणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
नॅशनल पार्क न्यूज या इंस्टाग्राम हँडलवरून ६ डिसेंबर रात्री सुमारे १०:३० वाजता पोस्ट करण्यात आलेले रीलने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिका-यांची “ दारु पार्टी” उघडकीस आणली आहे. या रीलमध्ये फॉरेस्टच्या चौकीमध्ये उशिरा रात्री “दारु पार्टी” झाल्याचा आरोप करण्यात आलाआहे. या “पार्टी”मध्ये एस जी एन एफ चे आर एफ ओ योगेश महाजन (कृष्णगिरी रेंज) आणि आर एफ ओ प्रदीप चव्हाण (तुळसि रेंज) सहभागी असल्याचा दावा करण्यात आला. या व्हिडीओची सत्यता तपासणी करण्यात येणार असून, जर असेल कृत्य घडले असेल तर त्याबाबत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचंही संचालिका अनिता पाटील यांनी म्हटलं आहे.

