मुंबई/महायुतीचा आगामी महापालिका निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, नागपुरात भाजपा आणि शिवसेना शिंदे गट एकत्र निवडणुक लढणार आहेत. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी आणि भाजपा वेगवेगळे निवडणूक लढणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीची ताकद समसमान आहे. अशात, कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि बंडखोरी होऊ नये, यासाठी भाजपा आणि राष्ट्रवादीने वेगळी रणनीती आखली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत वेगळं लढत विरोधकांना बाजूला सारलं जाणार आहे. नागपुरात भाजपाची ताकद अधिक असली, तरी मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला देखील सोबत घेतलं जाणार आहे. नवी मुंबईसंदर्भात अद्यापही निर्णय नाही, मात्र, भाजपा-सेना एकत्र येण्यासंदर्भात हालचाली सुरु आहेमहापालिका निवडणुकीसाठी उमेदवार आणि रणनीतीचा भाजपाकडून नवा पॅटर्न आणला जाणार आहे. नगर परिषद निवडणुकीत अनेक भागांमध्ये भाजपा आमदार, खासदार आणि बाहेरील प्रभारींनी उमेदावारापासून ते रणनीती निश्चितीपर्यंत मनमानी केल्याचं समोर आलं. त्यामुळे नव्या रणनीतीनं महापालिका निवडणुका सामोरे जाण्यासंदर्भात खलबतं सुरु असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. भाजपाच्या दृष्टीने १०० टक्के निवडून येण्याची खात्री असलेल्या प्रभागात तरुण एकनिष्ठ असलेल्या उमेदवारांना संधी दिली जाणार, आयात उमेदवार लादल्या जाणार नाही. विजयाचा विश्वास आहे, पण खात्री नाही अशात प्रभागांमध्ये पक्षांबरोबरच अन्य पक्षांतील व्यक्ती किंवा मोठी सामाजिक प्रतिष्ठा असलेल्यांचा विचार होणार आहे. युतीचा विषय बंद नाही, अशात मित्रपक्षाच्या नेत्याने आपल्याविरोधात बोलल्यास प्रतिक्रिया न देण्याच्या सूचना देण्यात येणार आहे.

