पुणे/पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या, शीतल तेजवानीचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. आरोपी शीतल तेजवानीने अभिनेता रणबीर कपूरवर नुकसान भरपाईचा दावा ठोकला आहे. शीतलने रणबीर कपूरच्या पुण्यातील अपार्टमेंटच्या भाडेकरारातील अटी पाळल्या नाहीत, असा आरोप करत त्याच्यावर दावा दाखल केला आहे. तसंच नुकसानभरपाई म्हणून ५० लाख ४० हजार रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे.
अभिनेता रणबीर कपूरचे पुण्यातील ट्रम्प टॉवर्समध्ये फ्लॅट्स आहेत. शीतल तेजवानीने करारात नमूद केलेल्या लॉक-इन कालावधीच्या आधीच घरातून काढून टाकण्यात आल्याबद्दल नुकसानभरपाई मागितली होती. तसेच त्यावर व्याजाची मागणी केली. हा दावा पुणे दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आला असून तेजवानीने एकूण ५० लाख ४० हजार रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे
पुणे येथील मुंढव्यातील ४० एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात शीतल तेजवानी मुख्य आरोपी असून तिची या आधी चौकशी देखील करण्यात आली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी ही जमीन खरेदी करण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य सुत्रधार म्हणून शीतल तेजवानीची याआधी दोन वेळा चौकशी केली होती. चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून शीतल तेजवानीचा जमिनीच्या गैरव्यवहारात थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यावर अखेर अटकेची कारवाई करण्यात आली.
पुणे जिल्ह्यातील मुंढवा जमीन प्रकरण हे ४०एकर जागेचं प्रकरण आहे. ही जागा आधी महार वतनाची होती. मग ती राज्य सरकारला आणि त्यानंतर केंद्र सरकारच्या बोटॅनिकल गार्डनला देण्यात आली. सुमारे १८०० कोटीची ही जमीन पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला ३०० कोटींमध्ये विकण्यात आली. त्यासाठीची २१ कोटींची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली आणि हा व्यवहार फक्त ५०० रुपयांच्या स्टॅम्प ड्युटीवर करण्यात आला.
मुंढवा भागातील ४० एकर जागा ज्यांना वतन म्हणून देण्यात आली होती त्यांच्या वंशजांकडून शीतल तेजवानीने पॉवर ऑफ अॅटर्नी मिळवली आणि त्यानंतर ती जागा पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला विकण्यात आली

