मुंबई, – काळाचौकी येथील जिजामाता नगर एसआरए पुनर्वसन प्रकल्पाला तब्बल ३० वर्षे उलटूनही कोणतीही लक्षणीय प्रगती न झाल्याने संतप्त रहिवाशांनी विकासक मे. शांती ओम रेसीडेन्सी प्रा. लि. यांना तात्काळ प्रकल्पातून हाकलून, पुनर्वसनाची जबाबदारी थेट शासनाने स्वीकारावी, अशी ठाम मागणी केली आहे.
३० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एसआरए प्रकल्पाचे काम विकासक मे. शांती ओम रेसीडेन्सी प्रा. लि. यांनी हाती घेतले आहे. गेल्या ३० वर्षात विकासकाला प्रकल्प पूर्ण करण्यात पूर्णपणे अपयश आले असून रहिवासी हक्काच्या घरांपासून वंचित राहिले आहेत. या मागणीसाठी युवा संघर्ष संघटनेचे कार्यकर्ते आणि रहिवासी यांनी प्रकल्पस्थळी आमरण उपोषणास सुरुवात केली, तर महिलांनी साखळी उपोषणात सहभाग नोंदवला आहे.
‘एसआरए’ने मे. शांती ओम रेसीडेन्सी प्रा. लि. विकासकां विरोधात कलम १३(२) अंतर्गत कारवाई केली होती l, उच्चस्तरीय बैठकीत ही प्रकल्पाचे काम सहा महिन्यांत सुरू करण्याचे दिलेले आश्वासनही पूर्ण झालेले नाही. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार “तीन दशके उलटली, पण अद्याप एकाही पुनर्वसन इमारतीचे काम सुरू झालेले नाही.”
अनेक वर्ष रखडलेल्या काळाचौकी जिजामाता नगर ‘एसआरए’ प्रकल्पामुळे रहिवाशांमध्ये संतापाचा उद्रेक वाढला असून, शासनाने त्वरित हस्तक्षेप करून विकासकांला प्रकल्पातून निष्कासित करावे आणि जिजामाता नगरचा एसआरए प्रकल्प शासन ताब्यात घेऊन पूर्ण करावा, अशी एकमुखी मागणी उपोषणकर्त्यांकडून केली जात आहे.
“आम्ही आमच्या हक्काच्या घरांसाठी लढत आहोत; शासनाने न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र होईल.” असा इशारा जिजामाता नगर युवा संघर्ष संघटनेचे विलास सोगम, संजय गोसावी, निलेश गुरव, विजय परब, मुकुंद गावडे, संदीप पांढरे, किरण निकम आदींनी निवेदनाद्वारे दिली आहे.

