मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या आधी वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या प्रभादेवी येथे अशीच एक घटना समोर आली आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या शाखेवरुन स्थानिक नागरिक आणि शिवसैनिकांमध्ये मोठा वाद झाला. प्रभादेवी येथील साई सुंदर नगर येथे सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास वाद झाला होता. या वादाचा व्हिडीओ देखील आता समोर आला आहे. इमारतीत शाखेच्या बाहेर तात्पुरता जे शेड उभारण्यात आलं आहे त्याला स्थानिकांनी विरोध केला. त्यावरुन हा वाद उफाळून आला. आपात्कालीन परिस्थिती शेडचा अडथळा येऊ शकतो, असं काही स्थानिकांचं म्हणणं होतं. स्थानिकांनी विरोध केल्यामुळे तिथे समाधान सरवणकर आले होते. तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील होते, अशी माहिती आहे.
स्थानिकांच्या विरोधानंतर दोन्ही बाजूने बाचाबाची झाली. या बाचाबाचीचं रुपांतर नंतर मोठ्या भांडणाच झाल्याचं समोर आलं आहे. यावेळी एकमेकांवर हेल्मेट भिरकावण्याचा प्रकार झाला. या घटनेचा जो व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये वादाची घटना कैद झाली आहे. स्थानिकांच्या रोषानंतर समाधान सरवणकर यांनी तिथून काढता पाय घेतला.घटनेवर समाधान सरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “वाद वगैरे असं काही झालं नाही. शेवटी तिथली लोकंही आमचीच आहेत. त्यांचे जे काही प्रश्न आहेत, त्यांना लायनी पाडायच्या आहेत. त्यांना पाण्याच्या लायनीदेखील मीच दिलेल्या आहेत. मेन जलवाहिनी मीच दिलेली आहे. त्या इमारतीच्या तळमजल्यावर कुणालाही जमणार नाही तशी जीम बांधून दिली आहे”, असं समाधान सरवणकर म्हणाले.माझ्या निधीतून आणि स्वखर्चातून मी हे त्यांना जीम बांधून दिली आहे. त्या इमारतीत माझे अनेक कामे आहेत. पण आता निवडणुकीत खूप इच्छुक झाले आहेत. त्यामुळे आम्ही काहीतरी करतोय हे त्यांना ‘मातोश्री’वर दाखवायचं आहे. त्यांना तिथे कोण विचारत नाही. इमारतीचा विषय करुन 50 लोकं गोळा करणं, हे त्यांचं चालू आहे. तशाप्रकारे हा विषय होता”, असं स्पष्टीकरण समाधान सरवणकर यांनी दिलं.

